बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 13:29 IST2026-04-03T13:28:40+5:302026-04-03T13:29:52+5:30

Amravati : अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांविरुद्ध चांदूरबाजार पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Bachchu Kadu booked for conspiracy to commit murder; Accused of trying to kill MLA's cousin | बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

Bachchu Kadu booked for conspiracy to commit murder; Accused of trying to kill MLA's cousin

प्रदीप भाकरे 
अमरावती:
अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांविरुद्ध चांदूरबाजार पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. विद्यमान आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत बंधू अभिजीत तायडे यांना अपघाताचा बनाव करून जिवानिशी ठार मारण्याचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

​नेमकी घटना काय?

अमरावतीचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत या प्रकरणाची अधिकृत माहिती दिली. प्राप्त तक्रारीनुसार, डिसेंबर महिन्यात बच्चू कडू यांच्या 'कुरळपूर्णा' येथील निवासस्थानी एक बैठक पार पडली होती. या बैठकीत बच्चू कडू, शुभम उर्फ गोलू माहोरे आणि एका अनोळखी इसमाने मिळून अभिजीत तायडे यांना अपघातात ठार मारण्याबाबत चर्चा केली होती. या संभाषणाचे रेकॉर्डिंग एका गोपनीय साक्षीदाराने आपल्या मोबाईलमध्ये केले होते, जे आता पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

​चांदूरबाजार पोलिसांनी याप्रकरणी फौजदारी स्वरूपाचा कट रचल्याप्रकरणी माजी आमदार बच्चू कडू (५६, रा.कुरळपूर्ण) ​गोलू माहोरे (५०) - रा. आशेगाव. ​एक अनोळखी इसम यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

​पुराव्यांची तांत्रिक तपासणी होणार

​तक्रारदार अभिजीत तायडे यांनी संभाषणाची रेकॉर्डिंग असलेला पेन ड्राईव्ह पोलिसांना दिला आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्पष्ट केले की प्रथमदर्शनी रेकॉर्डिंगमधील तथ्य लक्षात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​संभाषणाची सत्यता पडताळण्यासाठी ते न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार आहे. ​ज्या मोबाईलमध्ये हे रेकॉर्डिंग झाले, तो ओरिजनल डिव्हाइस जप्त करून फॉरेन्सिक तपासासाठी पाठवला जाईल. ​आमचे आमदार बंधू प्रवीण तायडे आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या जीविताला धोका आहे, त्यामुळे संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी," अशी मागणी अभिजीत तायडे यांनी आपल्या तक्रारीतून केली आहे.

​अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू आणि प्रवीण तायडे यांच्यातील राजकीय वैमनस्य सर्वश्रुत आहे. बच्चू कडू यांनी सलग चार वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रवीण तायडे यांनी त्यांचा पराभव केला. या पराभवानंतर दोन्ही गटांतील संघर्ष आता टोकाला गेल्याचे चित्र दिसत आहे.

​अमरावतीत कडक पोलीस बंदोबस्त

​या हायप्रोफाईल गुन्ह्यामुळे अचलपूर आणि चांदूरबाजार परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये, यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांनी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. ​या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासन अत्यंत गांभीर्याने करत असून, फॉरेन्सिक रिपोर्टनंतर अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Web Title: Bachchu Kadu booked for conspiracy to commit murder; Accused of trying to kill MLA's cousin