अनिल देशमुख कोरोना पाॅझिटिव्ह; जयंत पाटीलही संपर्कात, अमरावतीकरांची वाढली धडधड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 21:50 IST2021-02-05T21:50:33+5:302021-02-05T21:50:40+5:30
एक दिवसापूर्वी अर्थात गुरुवारी नामदार देशमुख दिवसभर अमरावतीत होते.

अनिल देशमुख कोरोना पाॅझिटिव्ह; जयंत पाटीलही संपर्कात, अमरावतीकरांची वाढली धडधड
- गणेश देशमुख
अमरावती : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे कोराना पाॅझिटिव्ह असल्याचे शुक्रवारी त्यांनी ट्विटरहून जाहीर केले. एक दिवसापूर्वी अर्थात गुरुवारी नामदार देशमुख दिवसभर अमरावतीत होते. भरगच्च कार्यक्रमादरम्यान त्यांचा अनेक महत्त्वाच्या लोकांशी संपर्क आला. त्या सर्वांची धडधड आता वाढली आहे.
राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी गृहमंत्र्यांनी पोलीस दलाची बैठक घेतली. त्यात अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हाधिकारी हे त्यांच्या संपर्कात आलेत. इतर अनेक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही संपर्क आला.
राष्ट्रवादी परिवार संवाद या पक्षीय कार्यक्रमात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह जिल्हाभरातील सर्वच महत्त्वाचे पक्षपदाधिकारी आणि कार्यकर्ते संपर्कात आले. अनिल देशमुखांनी पत्रकार परिषदेलाही संबोधित केले. पंत्रकारांचाही संपर्क आला. पुढे परतवाड्याला त्यांचे जाणे झाले. तेथेही अनेकांशी संपर्क आला. विदर्भात सर्वत्र कोराेनाचा आलेख मंदावत असताना अमरावती जिल्ह्याचा कोरानाआलेख अत्यंत चिंताजनकरित्या उंचावत आहे.
बुधवारी १७९ , गुरुवारी १५८ आणि शुक्रवारी २३३ कोरानारुग्ण आढळून आले. आता गृहमंत्र्यांची ही बातमी आल्यानंतर गृहमंत्र्यांना भेटलेल्यांची विशेषत: ज्येष्ठांची धाकधूक वाढली आहे. अनिल देशमुख यांनी संपूर्ण कालावधीत चेहऱ्यावर नीट मास्क लावलेला होता. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते त्यामुळे संपर्कात आलेल्यांना संसर्ग होण्याची शक्यता मंदावली आहे. अमरावतीतील वाढत्या कोराना संसर्गातून तर गृहमंत्र्यांना लागण झाली नसावी ना, असा मुद्दा जाणकारांमध्ये चर्चिला गेला.
दरम्यान, संपर्कात आलेल्या सर्वांनीच कोरोना चाचणी करण्याचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे. प्रकृती उत्तम असून लवकरच कोरानावर मात करून जनसेवेत रुजू होणार असल्याचे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे.