अमरावती हादरली! कठोरा नाका परिसरात सराफा व्यावसायिकाची सशस्त्र लूट; ८० तोळे सोने लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 02:01 IST2026-02-14T01:59:47+5:302026-02-14T02:01:49+5:30
६ ते ८ सशस्त्र लुटारूंनी भररस्त्यात हा थरार घडवून आणला असून, या घटनेमुळे संपूर्ण अमरावती शहरात मोठी खळबळ उडाली आहे...

अमरावती हादरली! कठोरा नाका परिसरात सराफा व्यावसायिकाची सशस्त्र लूट; ८० तोळे सोने लंपास
अमरावती : शहरातील कठोरा नाका ते पोटे पाटील रोड दरम्यान शुक्रवारी रात्री एका सराफा व्यावसायिकाला लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ६ ते ८ सशस्त्र लुटारूंनी भररस्त्यात हा थरार घडवून आणला असून, या घटनेमुळे संपूर्ण अमरावती शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुशांत मनोहर शेरेकर (रा. बालाजी नगर, कठोरा रोड) हे त्यांचे सराफा दुकान बंद करून रात्री १० च्या सुमारास घरी जात होते. यावेळी दबा धरून बसलेल्या अज्ञात ६ ते ८ लुटारूंनी त्यांना अडवले आणि शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील दागिन्यांची बॅग हिसकावून नेली. व्यावसायिकाच्या दाव्यानुसार, लुटारूंनी त्यांच्याकडून सुमारे ८० तोळे (८०० ग्रॅम) सोन्याचे दागिने लुटले आहेत.
पोलीस ताफा घटनास्थळी दाखल -
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त, डीसीपी गणेश शिंदे, श्याम घुगे, गुन्हे शाखा प्रमुख संदीप चव्हाण आणि गाडगे नगरचे ठाणेदार अतुल वर यांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असून लुटारूंचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
व्यावसायिकाने ८० तोळे सोन्याची लूट झाल्याचा दावा केला असला, तरी पोलिसांनी अद्याप अधिकृतपणे दागिन्यांच्या निश्चित किमतीला किंवा वजनाला दुजोरा दिलेला नाही. पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. भरवस्तीत आणि वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या या धाडसी चोरीमुळे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.