झटपट श्रीमंतीचा 'अमरावती पॅटर्न' ; केवळ दोन ग्रॅम सोने खरे बाकी सगळे खोटे ! काय आहे नवा कोरा 'गोल्ड फ्रॉड'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 13:20 IST2025-11-25T13:19:33+5:302025-11-25T13:20:34+5:30
Amravati : कोलकाता, मेरठहून बोलवायचे सोनेमिश्रित दागिने : सराफांकडे गहाण ठेवून उकळले लाखो रुपये

'Amaravati Pattern' of instant wealth; Only two grams of gold is real, the rest is fake! What is the new 'gold fraud'?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केवळ दोन ग्रॅम खरे सोने असलेला दागिना सराफा व्यावसायिकांकडे गहाण ठेवत रोख रक्कम उकळणाऱ्या दोन भामट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी अटक केली. गोविंदा गोपाळराव लोखंडे (३५, रा. आष्टी, ता. भातकुली, अमरावती) आणि मनोज त्र्यंबक दुधाणे (४१, आदर्शनगर, नागपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. झटपट श्रीमंतीचा हा 'अमरावती पॅटर्न' नवा कोरा 'गोल्ड फ्रॉड' म्हणून समोर आला आहे.
बनावट सोने गहाण ठेवून त्यांनी जिल्ह्यातील दहापेक्षा अधिक सराफा व्यावसायिकांना सुमारे १० लाखांना चुना लावला. २२ नोव्हेंबर रोजी परतवाडा येथील दोन व दर्यापूर व अंजनगाव येथील प्रत्येकी एका सुवर्णकाराची त्यांनी फसवणूक केली. त्यांनी चारही गुन्ह्यांची कबुली दिली आहे. 'एलसीबी'ने त्यांच्याकडून तब्बल ६ लाख ९ हजार ६०० रुपये रोख, दुचाकी व काही बनावट दागिने जप्त केले आहेत. यापूर्वी आपण चांदुरबाजार, चांदुर रेल्वे, परतवाडा व खामगाव येथे अशाच प्रकारे सुवर्ण व्यावसायिकांची फसवणूक केल्याचे आरोपींनी सांगितले. एसपी विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या 'टीम एलसीबी'ने ही कारवाई केली.
आवाहनानंतरही झाली फसवणूक
गोविंदा लोखंडे २२ नोव्हेंबर रोजी बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवण्यासाठी अंजनगाव सुर्जी येथील एका सुवर्णकाराकडे गेला. मात्र, दागिन्यांचा दर्जा पाहून सुवर्णकाराला संशय आला. त्यामुळे त्याने दागिने गहाण न ठेवता, दोन संशयास्पद व्यक्ती सोने गहाण ठेवण्यासाठी फिरत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. दरम्यान, हा व्हिडीओ पाहण्यापूर्वीच गोविंदा आणि मनोज दुधाणे यांनी शहरातील प्रिन्स अग्रवाल यांना गंडा घालून पोबारा केला होता. विशेष म्हणजे, त्यांच्याकडील हे बनावट दागिने अनुभवी सुवर्णकारदेखील ओळखू शकले नाहीत.
सोशल मीडियावरून शिकले नवा फंडा
गोविंदा याने फेसबुकवर असे व्यवहार करणाऱ्यांशी संवाद साधला. कोलकाता येथील एक इसम त्याला बडनेऱ्यात भेटायला आला.
त्यांच्यात व्यवहार ठरल्यानंतर २ कोलकाता येथून ते दागिने त्याच्याकडे पाठविले जाऊ लागले. त्यांनी मेरठहूनदेखील दागिने बोलावले.
१० ग्रॅमच्या दागिन्याला केवळ २ 3 ग्रॅम खऱ्या सोन्याचा मुलामा असलेली सुवर्णालंकार या भामट्यांना ३५ हजारांत मिळायचा.
तो ८० ते ८५ हजारांत गहाण ठेवून गोविंदा व मनोज त्यातून दहा ग्रॅममागे ४० ते ५० हजार रुपये कमवायचे. त्यांच्याकडून बनावट दागिनेदेखील जप्त करण्यात आले आहेत.