अभाविपचे ‘महाविद्यालय उघडा’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:31 IST2021-02-05T05:31:37+5:302021-02-05T05:31:37+5:30

प्राचार्यांना निवेदन, महाविद्यालयांसमोर निदर्शने अमरावती : बंद असलेली सर्व महाविद्यालये त्वरित सुरू करण्यात यावी, यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने ...

Abhavip's 'Open College' movement | अभाविपचे ‘महाविद्यालय उघडा’ आंदोलन

अभाविपचे ‘महाविद्यालय उघडा’ आंदोलन

प्राचार्यांना निवेदन, महाविद्यालयांसमोर निदर्शने

अमरावती : बंद असलेली सर्व महाविद्यालये त्वरित सुरू करण्यात यावी, यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने मंगळवारी ‘महाविद्यालय उघडा’ आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांसमोर निदर्शने करून लक्ष वेधण्यात आले.

महाविद्यालये १० महिन्यांपासून बंद आहेत. कोविडच्या परिस्थितीत बऱ्याच प्रमाणात सुधार आला असून, राज्य सरकारद्वारे दारूची दुकाने, मॉल, सिनेमागृहे व परिवहन सेवा तसेच पहिली ते पाचवी व नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. अशावेळी महाविद्यालयेच बंद का, असा प्रश्न विद्यार्थी परिषदद्वारे सरकारला विचारण्यात आला. महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा उपयोग करण्यात येत आहे. परंतु, त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर प्रश्नचिन्ह उभे होताना दिसत आहे. ऑनलाइन पद्धतीचा वापर करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. महाविद्यालयातील शिकवणी वर्ग, ग्रंथालय, वसतिगृह हे नियमित सुरू करण्यात यावे आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी अभाविपने आंदोलन केले. शासनाने महाविद्यालय सुरू करण्यास अधिक विलंब केल्यास विद्यार्थी परिषद तीव्र आंदोलन करेल, असा इशारा रवि दांडगे यांनी दिला.

अभाविपने महानगरातील विविध भागांतील प्रमुख महाविद्यालयांमध्ये मंगळवारी आंदोलन करण्यात आले. येथील शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्था, सिपना अभियांत्रीकी महाविद्यालय, नरसम्मा महाविद्यालय, बडनेरा येथील आर.डी.आय.के व के.डी. महाविद्यालय, नांदगाव पेठ येथील पुसदकर महाविद्यालय, राजापेठ येथील भारतीय महाविद्यालय अशा विविध प्रमुख महाविद्यालयांवर निदर्शने करून प्राचार्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.

Web Title: Abhavip's 'Open College' movement