निसर्गप्रेमींनी घेतला अरण्याचा रोमांचकारी अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 05:00 AM2022-05-20T05:00:00+5:302022-05-20T05:00:48+5:30

निसर्गप्रेमी, तसेच पर्यावरण व वन्यजीव संवर्धनासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने मचाण आरक्षणाची संधी देण्यात आली. त्यात केवळ साडेसातशे रुपये आकारून जेवण, नास्ता, पाण्याची कॅन, मचाणापर्यंत पोहोचविणे व आणण्यासाठी वाहनव्यवस्था पुरविण्यात आली. निसर्गप्रेमींसोबत मचाणावर एक वनकर्मचारीही उपलब्ध करून देण्यात आला. वडाळी वनरिक्षेत्र अंतर्गत पोहरा, वडाळी आदी भागात वन्य प्राणी गणनेत पक्षी, प्राण्यांची नाेंद ट्रॅप  कॅमेऱ्यात झाली.

A thrilling experience of nature taken by nature lovers | निसर्गप्रेमींनी घेतला अरण्याचा रोमांचकारी अनुभव

निसर्गप्रेमींनी घेतला अरण्याचा रोमांचकारी अनुभव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :  मेळघाटच्या अरण्यात बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात मचाणावर बसून पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यप्राण्यांचे निरीक्षण व जंगलातला रात्रीचा रोमांचकारी अनुभव निसर्गप्रेमींनी घेतला. पूर्वी प्राणिगणनेच्या हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला. आता गणनेसाठी अधिक शास्त्रशुद्ध पद्धत अवलंबली जाते. तथापि, नागरिकांना अरण्यानुभव मिळण्याचे पूर्वीच्या उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन हा उपक्रम कायम ठेवण्यात आला व  ‘निसर्ग अनुभव’ या जनजागृती उपक्रमात रूपांतरित करण्यात आला आहे.
 मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्फे सिपना, अकोट, गुगामल, मेळघाट वन्यजीव तसेच अकोला, पांढरकवडा आदी वन्यजीव विभागांमध्ये हा उपक्रम घेण्यात आला. कोविडकाळामुळे गत दोन वर्षे उपक्रम होऊ शकला नाही. आता निर्बंध दूर झाल्याने उपक्रमांत सहभागासाठी निसर्गप्रेमींमध्ये कमालीचा उत्सुकता व उत्साह होता. मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, परभणी, वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यांतील तसेच मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील निसर्गप्रेमीही उपक्रमात सहभागी होते.
चांदण्यात उजळून निघालेले अरण्य, रातकिड्यांचे आणि प्राण्यांचे निरनिराळे आवाज, हवेची झुळूक, पानांची सळसळ आणि पाणवठ्यावर येणारे विविध वन्यप्राणी यांचा अविस्मरणीय अनुभव निसर्गप्रेमींनी यावेळी घेतला. वाघ, बिबट्या, अस्वल, रानगवा, चितळ, सांबर, नीलगाय, उदमांजर असे अनेक वन्यजीव सहभागींना पाहता आले.
निसर्गप्रेमी, तसेच पर्यावरण व वन्यजीव संवर्धनासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने मचाण आरक्षणाची संधी देण्यात आली. त्यात केवळ साडेसातशे रुपये आकारून जेवण, नास्ता, पाण्याची कॅन, मचाणापर्यंत पोहोचविणे व आणण्यासाठी वाहनव्यवस्था पुरविण्यात आली. निसर्गप्रेमींसोबत मचाणावर एक वनकर्मचारीही उपलब्ध करून देण्यात आला. वडाळी वनरिक्षेत्र अंतर्गत पोहरा, वडाळी आदी भागात वन्य प्राणी गणनेत पक्षी, प्राण्यांची नाेंद ट्रॅप  कॅमेऱ्यात झाली.
 मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या संचालक ज्योती बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली, उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सुमंत सोळंके, दिव्या भारती, विभागीय वनाधिकारी किरण जगताप, प्रभाकर निमजे, मनोजकुमार खैरनार यांनी उपक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली. पर्यटन व्यवस्थापक स्वप्निल बांगडे, वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश तापस यांनी अथक परिश्रम घेतले.

Web Title: A thrilling experience of nature taken by nature lovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.