लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहर पोलिस आयुक्तालय परिसरात गुरुवारी सकाळी शीघ्र कृतिदलाच्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विजय दिलीप नागापुरे (वय ३२, रा. धामणगाव काटपूर, ता. मोर्शी, ह.मु., प्रिया पार्क, अमरावती) असे मृत जवानाचे नाव असून, या प्रकारामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
विजय नागापुरे हे २०१४ पासून पोलिस दलात कार्यरत होते. बुधवारी त्यांची नाइट ड्यूटी होती. गुरुवारी सकाळी ९:१० ते ९:२० च्या सुमारास पोलिस आयुक्तालय इमारतीच्या मागील बाजूला असलेल्या क्यूआरटी रेस्ट रूममध्ये ही घटना घडली. विजय यांनी आपल्या ताब्यातील 'ग्लॉक' पिस्तूलमधून कपाळाच्या उजव्या बाजूला गोळी झाडली, जी थेट डाव्या बाजूने आरपार निघाली. त्यांचा रिलिव्हर आकाश अंबरते हे रेस्ट रूममध्ये गेल्यानंतर हा प्रकार समोर आला. विजय यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात आली.
'क्लिअरली' आत्महत्या
- घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त राकेश ओला, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे व रमेश धुमाळ यांच्यासह गुन्हे शाखा प्रमुख संदीप चव्हाण व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
- मृत विजय यांचा मोबाइल तपासला असता, त्यात कोणतीही संशयास्पद माहिती आढळून आली नाही. पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना ही 'क्लिअरली' आत्महत्या असल्याचे स्पष्ट केले आहे.
आकस्मिक मृत्यूची नोंद
दरम्यान, गुरुवारी सकाळी ११:३५ च्या सुमारास विजय यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आला. शवविच्छेदनानंतर पार्थिव त्यांच्या मूळ गावी धामणगाव काटपूर येथे पाठवण्यात आले. विजय यांचा मोठा भाऊ श्याम नागापुरे हेदेखील गेल्या वर्षभरापासून शहर पोलिस दलात कार्यरत आहेत. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास तेथील दुय्यम ठाणेदार नीलेश गावंडे करत आहेत.
Web Summary : In Amravati, a QRT soldier, Vijay Nagapure, committed suicide by shooting himself at the police headquarters. Financial struggles are suspected as the cause. An investigation is underway after his body was sent for post-mortem. The incident has created shockwaves within the police force.
Web Summary : अमरावती में, क्यूआरटी के जवान विजय नागापुरे ने पुलिस मुख्यालय में खुद को गोली मारकर आत्महत्या कर ली। आर्थिक तंगी को कारण माना जा रहा है। पोस्टमार्टम के लिए शव भेजने के बाद जांच जारी है। इस घटना से पुलिस बल में सनसनी फैल गई है।