"आपण कन्व्हर्टेड मुस्लीम आहोत," सांगणाऱ्या माथेफिरूला इंदूरमध्ये केले अटक; कॉल कारण्यामागचा उद्देश काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 13:36 IST2025-12-01T13:36:15+5:302025-12-01T13:36:54+5:30
गुन्हे शाखेची कारवाई : लपवली होती ओळख, म्हणाला, नशेत केला धमकीचा कॉल

A man who said, "I am a converted Muslim," was arrested in Indore; What was the purpose of the call?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावती पोलिस आयुक्तालय परिसरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा अखेर २४ तासांच्या आत इंदूरमध्ये पकडला गेला. रविवारी पहाटे शहर गुन्हे शाखेचे पथक आरोपीसह अमरावतीत पोहोचले. हरीश पांडुरंग घाडवे ऊर्फ सोहेल पांडुरंग शेख (३३, रा. रहाटगाव, अमरावती) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. अमरावती शहर पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन करून बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्याची कबुली त्याने दिली. आपण ते कृत्य नशेत केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, फ्रेजरपुरा पोलिस विविध अंगाने त्याची चौकशी करीत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी रविवारी दिली.
शहर पोलिस आयुक्तालयातील कंट्रोल रूमच्या लैंडलाइन व एका मोबाइल क्रमांकावर २८ नोव्हेंबरला रात्री ८:२० च्या सुमारास अज्ञात कॉल आला. "आपण कन्व्हर्टेड मुस्लीम आहोत," असे सांगत त्याने आपली ओळख हरीश अशी करून दिली, तसेच पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावे शिवीगाळही केली. याप्रकरणी कंट्रोल रूममधील एएसआय कमल लाडवीकर यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी २९ नोव्हेंबर रोजी पहाटे गुन्हा दाखल केला. त्यानंतर तातडीने त्या कॉलरचे रहाटगाव येथील घर शोधत त्याची पार्श्वभूमी पोलिसांनी तपासली.
रात्रभर प्रवास करून शहरात
आरोपीचे लोकेशन मध्य प्रदेशातील इंदूर येथे आल्याने पोलिस उपायुक्त गणेश शिंदे व गुन्हे शाखा प्रमुख पीआय संदीप चव्हाण यांनी तातडीने इंदूर पोलिसांची मदत घेतली. तो तेथून पुढे पळून जाऊ नये, यासाठी इंदूर पोलिसांनी त्याला २८ ला सायंकाळी ताब्यात घेतले. गुन्हे शाखेतील अंमलदार फिरोजखान, सतीश देशमुख, नईम बेग, रंजीत गावंडे, प्रभात पोकळे यांची टीम शनिवारी मध्य प्रदेशातच अन्य गुन्ह्याच्या तपासासाठी तेथे होती. त्यांनी शनिवारी रात्रभर प्रवास करून आरोपी सोहेल पांडुरंग शेख याला अमरावतीत आणले. यानंतर त्याला फ्रेजरपुरा पोलिसांच्या सुपुर्द करण्यात आले. त्याला रविवारी न्यायालयाने २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.