पश्चिम विदर्भात १० महिन्यांत ८८८ शेतकऱ्यांनी जीवन संपवले; दिवाळीत ८७ शेतकऱ्यांनी कवटाळला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 14:01 IST2025-11-13T14:00:19+5:302025-11-13T14:01:03+5:30
Amravati : पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यात जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद केल्या जाते. तेव्हापासून ऑक्टोबर २०२५ या कालावधीत २२,०३८ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढला आहे.

888 farmers committed suicide in West Vidarbha in 10 months; 87 farmers died during Diwali
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पश्चिम विदर्भातशेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबता थांबलेले नाही. यावेळी दिवाळीच्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये तब्बल ८७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे, तर यंदाच्या १० महिन्यांत ८८८ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. १ जानेवारी २००१ पासून आतापर्यंत २२,०३८ शेतकरी आत्महत्या झाल्याचे वास्तव आहे.
पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यात जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद केल्या जाते. तेव्हापासून ऑक्टोबर २०२५ या कालावधीत २२,०३८ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढला आहे. यामध्ये शासन मदतीसाठी ११,२९५ प्रकरणे पात्र ठरली तर त्यापेक्षा अधिक ११,३६६ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे वर्षभरापासून ३७७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याची विभागीय आयुक्तालयाची आकडेवारी आहे. हे सर्व शेतकरी केवळ अस्मानी-सुल्तानी संकटाचे नव्हे, तर शासन, प्रशासनाच्या अनास्थेचे बळी असल्याचा आरोप होत आहे.
नैसर्गिक आपत्ती, नापिकी, दुष्काळ, बँकांसह खासगी सावकारांचे कर्ज, मुलींचे लग्न, आजारपण आदींसह अन्य कारणांमुळे पश्चिम विदर्भात राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत. यामध्ये यवतमाळ, अमरावती व बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रकार वाढल्याचे वास्तव आहे.
२००१ पासून आत्महत्या
यवतमाळ - ६४८९
अमरावती - ५५४६
बुलढाणा - ४५९२
अकोला - ३२६२
वाशिम - २१४९
दर आठ तासांत एक शेतकरी आत्महत्या
पश्चिम विदर्भात १० महिन्यांत म्हणजेच ३०५ दिवसांत ८८८ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. म्हणजेच अमरावती विभागात दर आठ तासाला एक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. यामध्ये सर्वाधिक ३१६ शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत. किंबहुना राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात होत आहेत.