६० हजार मजूर, ६२ कोटी अडकले, स्थलांतर वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 13:31 IST2025-03-04T13:29:08+5:302025-03-04T13:31:23+5:30
होळीपूर्वी मजुरांचे वेतन देण्याची मागणी : केवळराम काळे यांचे पत्र

60 thousand laborers, 62 crores were trapped, migration increased
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील जवळपास ६० हजार मजुरांचे ६२ कोटींपेक्षा अधिक मजुरीची रक्कम न मिळाल्याने त्यांची होळी अंधारात जाण्याची भीती 'लोकमत'मध्ये प्रकाशित करताच त्याची दखल घेत मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे भेट घेऊन पत्र दिले आणि निधीची मागणी केली.
मेळघाट विधानसभा क्षेत्र हा आदिवासी बहुल भाग असून चिखलदरा व धारणी तालुक्यातील मजूर वर्ग महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून कामे करीत आहेत. परंतु मेळघाटमधील मजुरांची मजुरी ही मागील चार ते पाच महिन्यांपासून अद्यापपर्यंत मिळालेली नाही. मजुरांना उदरनिर्वाह करणे कठीण होऊन बसल्याने मेळघाटमधील मजुरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे.
तीन महिन्यांपासून वेतन नाही
मागील तीन महिन्यांपासून मेळघाटातील आदिवासी मजुरांचे वेतन मिळाले नाही. वेतन मिळावे यासाठी आदिवासींनी ताला ठोको आंदोलन झाले. तरीसुद्धा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. आमसभेत लाडकी बहिणीच्या पैशाच्या भरवशावर घरदार चालत असल्याचे आदिवासी महिला सरपंचाने सांगितले. यावेळी तत्काळ मजुरांना त्यांचे वेतन देण्याची मागणी मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.
शासन निर्णयाची आठवण, होळी सण
शासन निर्णयाप्रमाणे मजुरांना १५ दिवसांपर्यंत मजुरी मिळणे अपेक्षित असताना व आदिवासी बांधवांचा सर्वात मोठा मुख्य सण होळी असून मजुरी न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे. तरी आपण १३ मार्च रोजी होणाऱ्या होळी सणापूर्वी रोहयोचे काम करणाऱ्या मजुरांचे पगार देण्याची मागणी आ. काळे यांनी केली आहे.