चिंताजनक! मेळघाटात 6 महिन्यांत आठ मातांसह ३६४ बालकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 09:18 PM2018-10-13T21:18:05+5:302018-10-13T21:18:12+5:30

टायरअभावी आरोग्य विभागाची वाहने उभी; औषधांच्या तुटवड्यामुळे हाल

364 children and 6 mothers died in six months in melghat | चिंताजनक! मेळघाटात 6 महिन्यांत आठ मातांसह ३६४ बालकांचा मृत्यू

चिंताजनक! मेळघाटात 6 महिन्यांत आठ मातांसह ३६४ बालकांचा मृत्यू

googlenewsNext

- नरेंद्र जावरे 

परतवाडा : मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात सहा महिन्यांत आठ मातांसह ३६४ बालकांचा विविध आजाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत रविवारी तिसऱ्यांदा धारणी तालुक्यातील बिजुधावडी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देणार आहेत. टायरअभावी आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका उभ्या असून, लहान बालकांसाठी आवश्यक औषधसाठा तेथे उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे.

मेळघाटात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत ० ते ६ वयोगटातील २६४ बालके दगावली, तर शंभर उपजत बालकांचा मृत्यू, अशी एकूण १८० दिवसांत ३६४ बालके दगावली. ऑक्टोबर महिन्यात दहा दिवसांत ११ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद नुकतीच झाली. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक बालमृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली असून, गेला आठवडाभर आरोग्य संचालक नागपूर व अकोला येथील आरोग्य उपसंचालक व इतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मेळघाटचे दौरे केले. आरोग्य केंद्रांना भेटी दिल्यात. यामध्ये मेळघाटातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अनेक वाहनांना टायर नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. मेळघाटातील बालमृत्यू रोखण्यासाठी प्रभावी मोहीम राबवणे गरजेचे असल्याचे मत स्वयंसेवी संस्थेचे बंड्या साने यांनी शासनाकडे मांडले असून, बालमृत्यूची आकडेवारीसुद्धा त्यांनी शुक्रवारी न्यायालयात सादर केली.

बाल व स्त्रीरोगतज्ज्ञ दाखल, मात्र औषधांचा पत्ताच नाही
मेळघाटातील बालमृत्यूचे तांडव पाहता तीन स्त्रीरोगतज्ज्ञ व सात बालरोग तज्ञांची तत्काळ नियुक्ती काही दिवसांसाठी करण्यात आली. मेळघाटातील खेड्यापाड्यांत जाऊन हे तज्ञ डॉक्टर माता आणि बालकांची तपासणी करत आहेत. परंतु, बालकांसाठी सर्दी, खोकला, तापासाठी उपयोगी औषध आरोग्य केंद्रात उपलब्ध नसल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका कर्मचाऱ्याने दिली. 

न्युमोनियाने आठ मातांचा मृत्यू
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक बालमृत्यू धारणी तालुक्यात झाले. त्यात न्युमोनियाने बालमृत्यूची संख्या वाढली आहे. ऑक्टोबर महिन्यात धारणी व चिखलदरा तालुक्यात १२ दिवसांत ११ बालकांचा मृत्यू झाला. गत दोन महिन्यांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. सहा महिन्यात आठ मातामृत्यू झाले. यात मध्यप्रदेश व बाहेरगावी ५ मृत्यू झाले असून तीन मेळघाटात झाल्याचे आरोग्य विभागाने कळवले.

सहा महिन्यांत ० ते सहा वर्षांच्या आतील २६४ व उपजत शंभर बालकांचा मृत्यू झाला. ऑक्टोबर महिन्यात बालमृत्यू रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. बालरोग, स्त्रीरोग तज्ज्ञ मेळघाटात कार्यरत आहे. वाहनांना टायर व औषधसाठा दिला जात आहे.
- सुरेश असोले, 
जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती
 

Web Title: 364 children and 6 mothers died in six months in melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.