पाणीटंचाईच्या कामांना देयकांची आडकाठी!

By Admin | Updated: July 13, 2014 21:34 IST2014-07-13T20:12:07+5:302014-07-13T21:34:01+5:30

पाणीटंचाईअंतर्गत केलेल्या कामांची १ कोटी रुपयांची देयके न मिळाल्याने कंत्राटदारांनी पाणीटंचाईच्या कामांकडे पाठ फिरविली

Water scarcity works to stop payments! | पाणीटंचाईच्या कामांना देयकांची आडकाठी!

पाणीटंचाईच्या कामांना देयकांची आडकाठी!

अकोला : पाऊस येण्यास विलंब झाल्याने जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. अशाच पाणीटंचाईअंतर्गत करण्यात आलेली कामेही अर्धवट आहे. ही कामेच पूर्ण होत नसल्याने नवीन कामांकडेही कंत्राटदारांनी पाठ फिरविली आहे. गतवर्षी पाणीटंचाईअंतर्गत केलेल्या कामांची १ कोटी रुपयांची देयके न मिळाल्याने कंत्राटदारांनी पाणीटंचाईच्या कामांकडे पाठ फिरविली असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत दिली. पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी पाऊस पडला नाही. त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात पाणीटंचाईची कामे तातडीने करण्याचे शासनाने निर्देश आहे. असे असले तरी अकोला जिल्ह्यात पाणीटंचाईची कामे करण्यासाठी कंत्राटदारच पुढे येत नाही. आठ बोअर करून तयार आहेत; पण त्यांच्यावर हापपंप बसविण्यात आले नाही. याबाबत स्थायी समिती सभेत विजय लव्हाळे यांनी प्रश्न उपस्थित केला असता अधिकार्‍यांनी कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले. गतवर्षी पाणीटंचाईचे कामे केली. त्यातील १ कोटी रुपयांच्या देयकांसाठी निधी मिळाला नाही. त्यामुळे कंत्राटदार आता पाणीटंचाईची कामे करण्यास उत्सुक नसल्याचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार यांनी सांगितले. या निधीसाठी मंत्रालयापर्यंत पाठपुरवठा करूनही निधी मिळाला नाही. आठवडाभरात निधी मिळण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Water scarcity works to stop payments!