अकोला : अनंत विश्वाच्या पसाऱ्यात अगणित खगोलीय घटना घडत राहतात. आगामी २०२५ वर्षात दोन चंद्रग्रहणे, दोन सूर्यग्रहणे, ११ उल्कावर्षाव, सूपरमून, धूमकेतू, ग्रह-ताऱ्यांची युती-प्रतियुती, ग्रह दर्शन, त्यांचे उदयास्त, राशी भ्रमण अशा अनेक खगोलीय घटनांची मेजवानी आकाश निरीक्षणप्रेमींना मिळणार असल्याची माहिती ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली. या घटना पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
प्रकाश उत्सव
तुटणाऱ्या ताऱ्यांच्या स्वरूपात दिसणारा विविधरंगी उल्कावर्षाव वर्षारंभी ३ जानेवारीला होईल. त्यानंतर २२ एप्रिल, ५ मे, २८ जुलै, १२ व १३ ऑगस्ट, ५, १२ व १७ नोव्हेंबर, १४ व २२ डिसेंबरच्या रात्री या आकाश दिवाळीत सहभागी होता येईल.
युती-प्रतियुती
चंद्र आणि ग्रह यांची युती दरमहा घडत असून, ग्रह व ग्रहांची युती एक अनोखी अनुभूती देते. अशी स्थिती १८ जानेवारीला पश्चिमेस शुक्र व शनि, २५ फेब्रुवारीला बुध व शनि, ११ मार्चला बुध व शुक्र, १० व २५ एप्रिल रोजी अनुक्रमे बुध व शनि, शुक्र आणि शनि, ८ जूनला बुध व गुरु, १४ ऑगस्टला गुरू आणि शुक्र एकमेकांच्या जवळ पाहता येतील.
७ सप्टेंबरला खग्रास चंद्रग्रहण
नव्या वर्षात सूर्य- चंद्राची प्रत्येकी दोन अशी एकूण चार ग्रहणे होणार असून, यापैकी फक्त एकच ७ सप्टेंबर रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण सुमारे साडेतीन तास बघता येईल.
१४ मार्चचे खग्रास चंद्रग्रहण, २९ मार्च आणि २१ सप्टेंबरचे खंडग्रास सूर्यग्रहण मात्र भारतात दिसणार नाही.
चंद्र येईल पृथ्वी समीप
पौर्णिमेला पृथ्वीपासून चंद्र जवळ असतो तेव्हा चंद्रबिंब मोठ्या आकाराचे व अधिक प्रकाशित दिसते, अशी स्थिती यावर्षी ७ ऑक्टोबर, ५ नोव्हेंबर आणि ५ डिसेंबरच्या रात्री बघता येईल.
यातील कार्तिक पौर्णिमेला या वर्षातील सर्वात मोठा व प्रकाशमान चंद्र असेल. पृथ्वी अधिक सूर्याभोवती लंबवर्तुळाकार फिरताना या दोन्हीतील अंतर कमी-अधिक होत असते. येत्या ४ जानेवारीला हे अंतर १४ कोटी ७० लाख कि. मी. एवढे राहील तर ४ जुलैला हे अंतर १५ कोटी २० लाख कि. मी. असेल.