नांदेड गुरुद्वारामध्ये गोळीबार, अकोल्यात फिल्मी स्टाईल थरार; पाठलाग करत पाच आरोपींना ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 13:49 IST2026-01-10T13:48:02+5:302026-01-10T13:49:20+5:30
नांदेड शहरातील गुरुद्वारामध्ये गोळीबाराची घटना घडली. या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. त्यांना पकडण्यात अखेर यश आले आहे.

नांदेड गुरुद्वारामध्ये गोळीबार, अकोल्यात फिल्मी स्टाईल थरार; पाठलाग करत पाच आरोपींना ठोकल्या बेड्या
Akola Crime news: नांदेड येथील हजुर साहेब गुरुद्वारामध्ये झालेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेनंतर फरार झालेल्या पाच आरोपींना ताब्यात घेण्यात अकोला स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. पोलिसांनी पाठलाग करत तरोडा टोल नाक्यावर पहाटे ४ वाजता आरोपींना बेड्या ठोकल्या.
३ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११:३० वाजता नांदेडचेपोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी अकोला पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याशी संपर्क साधत, गुरुद्वारा हजुर साहेब येथे दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबारातील फरार आरोपी अकोल्याच्या दिशेने येत असल्याची माहिती दिली.
आरोपींचे फोटो व संशयित वाहनांचे क्रमांकही तत्काळ पाठविण्यात आले. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांना तत्काल पातूर बाळापूर पोलिस ठाण्यांशी समन्वय साधत नाकाबंदी केली. नांदेडकडून येणारे संशयित वाहन पातूर शहरातून अकोल्याच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळताच एलसीबी पथक सतर्क झाले.
आरोपींनी पोलिसांना दिला चकमा, पण...
हिंगणा फाटा येथे नाकाबंदीदरम्यान वाहनाने अचानक बाळापूरच्या दिशेने वळत दोन-तीन वेळा 'यू-टर्न' घेऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाळापूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश झोडगे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग कायम ठेवत तरोडा टोल नाक्यावर पहाटे ४ वाजता पीबी-०५, एटी-४४०१ हे वाहन थांबविले.
वाहनातून गुरलाल सिंग (फिरोजपूर), हरपाल सिंग (मोगा), बलजिंदर सिंग (फिरोजपूर), पेशर सिंग (कपूरथला) व दविंदर सिंग (फिरोजपूर) या पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींना नांदेड पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया केली.