अकोल्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम प.बंगालच्या बँकेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 04:56 IST2018-08-18T04:55:41+5:302018-08-18T04:56:02+5:30
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षी पीक विमा काढलेल्या बहुतांश शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील अकोट तालुक्यासह अन्य काही ठिकाणच्या शेतक-यांची पीक विम्याची रक्कम चक्क पश्चिम बंगालमधील स्टेट को-आॅपरेटिव्ह बँकेच्या खात्यात वळती करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

अकोल्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम प.बंगालच्या बँकेत!
- संतोष येलकर
अकोला - प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षी पीक विमा काढलेल्या बहुतांश शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली
आहे. मात्र, जिल्ह्यातील अकोट तालुक्यासह अन्य काही ठिकाणच्या शेतक-यांची पीक विम्याची रक्कम चक्क पश्चिम बंगालमधील स्टेट
को-आॅपरेटिव्ह बँकेच्या खात्यात वळती करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात अकोला जिल्ह्यात शेतक-यांनी मूग, उडीद, कपाशी, सोयाबीन व तूर पिकांचा विमा काढला होता. विमा हप्त्याची रक्कम संबंधित बँकेत जमा करून नॅशनल इन्श्युरन्स कंपनीचा विमा काढण्यात आला. संबंधित शेतक-यांना विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली. नॅशनल इन्श्युरन्स कंपनीमार्फत जिल्ह्यातील बहुतांश शेतक-यांना पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली. मात्र, काही शेतकºयांना अद्यापही पीक विमा रकमेचा लाभ मिळाला नाही. ९ आॅगस्ट रोजी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अकोट येथील शाखेत विम्याची रक्कम मंजूर झाली. मात्र, अद्याप खात्यात जमा झालेली नाही, अशी तक्रार तेल्हारा तालुक्यातील शिरसोली येथील शेतकरी तथा माजी आमदार वसंतराव खोटरे यांच्यासह अनेक शेतकºयांनी नॅशनल इन्श्युरन्स
कंपनीच्या मुंबई येथील विभागीय व्यवस्थापक कार्यालयातही केली.
तसेच या संदर्भात खोटरे, यांच्यासह नारायणराव गव्हाणकर, डॉ. जगन्नाथ ढोणे व डॉ. अशोक ओळंबे यांनी ७ आॅगस्ट रोजी मुंबई येथील
नॅशनल इन्श्युरन्स कंपनीच्या व्यवस्थापकांसोबत चर्चा केली असता, अकोट तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक शेतक-यांच्या पीक विम्याची रक्कम पश्चिम बंगालमधील स्टेट को-आॅपरेटिव्ह बँकेच्या लोहापूर शाखेत वळती करण्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आली.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अकोट येथील शाखेतून मी पीक विमा काढला. विमा मंजूर झाला असून, यादीत नावेही आहेत; मात्र माझ्यासह जिल्ह्यातील अनेक शेतकºयांच्या खात्यात अद्याप पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही. ही रक्कम पश्चिम बंगालमधील बँकेत जमा करण्यात आली आहे.
- वसंतराव खोटरे, माजी आमदार तथा शेतकरी (शिरसोली, जिल्हा अकोला)
चौकशीचे आश्वासन : खोटरे यांनी या प्रकरणी १६ आॅगस्ट रोजी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सभेत तक्रार केली. या संदर्भात चौकशी करण्यात येणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले आहे.