Hidayat Patel Murder: हिदायत पटेल हत्या प्रकरणात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे; कुटुंबियांच्या तक्रारीत धक्कादायक आरोप
By सदानंद सिरसाट | Updated: January 7, 2026 15:05 IST2026-01-07T15:05:16+5:302026-01-07T15:05:51+5:30
Hidayat Patel Murder Case: कुटुंबियांच्या तक्रारीवरून पाच जणांवर कारवाई करण्यात आली

Hidayat Patel Murder: हिदायत पटेल हत्या प्रकरणात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे; कुटुंबियांच्या तक्रारीत धक्कादायक आरोप
अकोला : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर मंगळवारी दुपारी त्यांच्या अकोट तालुक्यातील मोहाळा गावातील मशिदीत प्राणघातक हल्ला झाल्यानंतर अकोला येथे खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा बुधवारी पहाटे तीन वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी कुटुंबियांच्या तक्रारीवरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) चे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बद्रूजम्मा, अकोटचे माजी काँग्रेस नगराध्यक्ष संजय बोडखे, काँग्रेस नेते व जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजीव बोचे, मुख्य हल्लेखोर उबेद पटेल, आणखी एक संशयित आरोपीचा समावेश आहे. या सर्वांवर खुनाचा प्रयत्न आणि कट रचल्याचे गंभीर आरोप तक्रारीत आहेत.
मंगळवारी दुपारी अकोट तालुक्यातील मोहाळा गावात, मशिदीत नमाज अदा केल्यानंतर कुराणचे वाचन करीत असतानाच हिदायत पटेल यांच्यावर आरोपीने प्राणघातक चाकू हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पोटावर आणि मानेवर गंभीर वार करण्यात आले होते. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या पटेल यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, बुधवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हल्लेखोर उबेद पटेल अटकेत
या हल्ल्यामागे राजकीय आणि कौटुंबिक वाद असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणाने आता राजकीय कटाचे वळण घेतलं आहे. मुख्य हल्लेखोर उबेद पटेल याला अकोट तालुक्यातील पणज गावातून स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
आरोपींच्या यादीत राजकीय नेत्यांची नावे
हिदायत पटेल हल्ला प्रकरणात अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात एकूण ५ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) जिल्हाध्यक्ष मोहम्मद बद्रूजम्मा, अकोटचे माजी काँग्रेस नगराध्यक्ष संजय बोडखे, काँग्रेस नेते व जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजीव बोचे, मुख्य हल्लेखोर उबेद पटेल, आणखी एका संशयित आरोपीचा समावेश आहे.
कुटुंबीयांच्या तक्रारीने खळबळ
पटेल कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर तपासाला वेग आला आहे. तक्रारीत थेट राजकीय हस्तक्षेप आणि पूर्वनियोजित कटाचा आरोप केला आहे.
नमाजानंतर थेट हल्ला
पटेल सवयीप्रमाणे त्यांचे घरानजीक असलेल्या मरकज मशिद मध्ये दुपारी १.३० वाजता जोहरच्या नमाज पठणाकरिता गेले होते. नमाज पठणानंतर मशीदमधील इतर लोक आपापल्या घरी गेले. त्याचप्रमाणे गावातील लोकही आपापल्या कामावर गेलेले होते. परंतु पटेल मात्र कुराण शरीफचे वाचन करीत तिथेच बसले होते. नमाज पठणानंतर काही वेळ कुराण शरीफचे वाचन करणे हा त्यांचा शिरस्ता होता. यावेळी हल्लेखोराने कुराण शरीफ वाचण्यात मग्न झालेल्या पटेल यांच्या मानेवर जबर वार केला. त्यानंतर त्यांचे पोटावर वार करून तो धावत सुटला. जखमांतून रक्तप्रवाह होत असतानाही पटेल उठले आणि चालत मशिदीच्या बाहेर पडले. अंदाजे ५० फुटावरील एका घराजवळ ते बसले. त्यांची रक्तबंबाळ अवस्था पाहून रस्त्यातील एका व्यक्तीने त्यांना पाणी पाजले. सर्वांना माहिती दिली. त्यानंतर पटेल यांना तातडीने आकोट येथे आणले गेले.
राजकीय क्षेत्रातील मोठे नाव
हिदायत पटेल हे सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, काँग्रेसचा जिल्ह्यात सर्वात प्रभावशाली मुस्लिम नेता, २०१४ व २०१९ मध्ये अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढले. अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २५ वर्षे संचालक, अकोट तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष, अकोट बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक, तब्बल ३५ वर्षांपासून सहकार व राजकारणात त्यांचा दबदबा होता.