सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट प्रसारित करणाऱ्या ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 18:12 IST2020-04-04T18:12:09+5:302020-04-04T18:12:16+5:30
११ जणांविरुद्ध विविध कलमांनुसार शनिवारी गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली.

सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट प्रसारित करणाऱ्या ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पारस : बाळापूर तालुक्यातील पारस येथील अनिल राऊत याने दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल, अशा पद्धतीने कोरोना विषाणू संसर्ग संदर्भात व्हॉट्स अॅपद्वारे आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्यामुळे बाळापूर पोलिसांनी अनिल पांडुरंग राऊत, गजानन साहेबराव राऊत (५0 रा. लेबर कॉलनी, तारफैल) यांच्यासह ११ जणांविरुद्ध विविध कलमांनुसार शनिवारी गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अकोला जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी कलम १४४ जाफौनुसार जमावबंदी आदेश लागू केला आहे. असे असतानाही पारस येथे काही लोक बेकायदेशीरपणे जमाव जमवताना निदर्शनात आले. त्यामुळे बाळापूर पोलिसांनी शाकिरअली आबिदअली सय्यद (२९), सय्यद आजम सय्यद रसूल (३0), आमिनखान हमीदखान (६७), मोहम्मद जफर मो. रफिक, अमिनोद्दिन मोहम्मद इस्लाम (४३), इरफान खान बिस्मिल्ला खान (४१), बिलालखान जलालखान (४७), जमील अहमद अब्दुल अहमद (६५), शेरू पठाण हारून पठाण (३१) सर्व राहणार पारस अशा भादंवि कलम १४३, १४९, १८८ सहकलम ३६ (३) १३५ मपोकानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. तसेच अनिल राऊत व गजानन राऊत यांच्याविरुद्ध भादंवि कलम २९५ अ, ५०५ (२) सहकलम ५४ आपत्ती व्यवस्थापन कायदा गुन्हा दाखल करून व्हॉट्स अॅप ग्रुपचा अॅडमिन आणि व्हॉट्स अॅपवर पोस्ट प्रसारित करणारा इसम अशा दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पारस येथे दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पारस येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.