बाळापुरात लिंबूच्या आकाराएवढी गार पडली

By Admin | Updated: January 1, 2015 01:45 IST2015-01-01T01:45:30+5:302015-01-01T01:45:30+5:30

अवकाळी पाऊस; गारपिटीचा तडाखा

In Babapur, there was a lot of lemon size | बाळापुरात लिंबूच्या आकाराएवढी गार पडली

बाळापुरात लिंबूच्या आकाराएवढी गार पडली

अकोला: जिल्हय़ात बुधवारी अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. अकोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये जोरदार पाऊस बरसला. बाळापूर शहर व परिसराला बुधवारी सायंकाळी अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले. पातूर तालुक्यातील काही गावांमध्येही गारपीट झाल्याचे वृत्त आहे. गत काही दिवसांपासून असलेल्या थंडीच्या लाटेनंतर जिल्हय़ात दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. बाळापूर शहरात लिंबाच्या आकाराच्या गारा बरसल्या तर तालुक्यातील पारस, हातरूण आदी गावांमध्येही बोराच्या आकाराच्या गारा पडल्या. तालुक्यातील बोरगाव वैराळे परिसरातही जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. पातूर तालुक्यातील तुलंगा, चतारी, पिंपळखुटा, चांगेफळ, खेट्री, शिरपूर आदी गावांमध्ये हरभर्‍याच्या आकाराची गारपीट झाली. दहिहंडा येथे देखील गारपीट झाली. अकोला शहर व तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाने सायंकाळी जोरदार हजेरी लावली. तालुक्यातील गांधीग्राम, आगर, वल्लभनगर, गोपालखेड आदी गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. आकोट, तेल्हारा व मूर्तिजापूर तालुक्यातील काही गावांमध्ये तुरळक पाऊस झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, काही ठिकाणी या पावसामुळे हरभरा व कपाशी पिकाचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. *नववर्षाच्या जल्लोषावर पावसाचे विरजण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आज शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु सायंकाळ पासूनच पावसाने आपली हजेरी दर्शविली. त्यामुळे रात्री जल्लोषाचे बेत आखणार्‍यांचा चांगलाच हिरमोड झाला. रात्री तरी पाऊस थांबेल अशी अपेक्षा होती. परंतु रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे घराच्या गच्चीवर किंवा शहरातील हॉटेलमध्ये जाऊन जल्लोष करणार्‍यांनी बंद खोलीतच जल्लोष साजरा केला. फटाके फोडणे किंवा डिजे लावून नाचणार्‍यांचे बेत देखील बुधवारच्या पावसाने पार उधळून लावले.

Web Title: In Babapur, there was a lot of lemon size