अंगणवाडीच्या पोषण आहारात निघाले तार!

By Admin | Updated: June 19, 2015 02:36 IST2015-06-19T02:36:39+5:302015-06-19T02:36:39+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील नांद्राकोळी येथील घटना; जिल्हा परिषदेकडे तक्रार.

Anganwadi nutrition is in the drain! | अंगणवाडीच्या पोषण आहारात निघाले तार!

अंगणवाडीच्या पोषण आहारात निघाले तार!

बुलडाणा : ग्रामीण भागातील बालवाडीच्या बालकांना दिल्या जाणार्‍या राजगिरा चिक्कीच्या पोषण आहारात चक्क खिळे, तार व लोखंडी वस्तू निघाल्याचा प्रकार नांद्राकोळी येथे १८ जून रोजी उघडकीस आला. या संदर्भात येथील नांद्राकोळी ग्रामपंचायत सदस्यांनी जि. प. चे मुख्य कार्यपालन अधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे. एकात्मिक बाल विकास प्रकल्प योजनेंतर्गत सुरू असलेल्या बालवाड्यांतील बालकांसाठी सूर्यकांता महिला औद्योगिक सह. संस्था वेंगुर्ले जि. रत्नागिरी ही संस्था राजगिरा चिक्की पोषण आहारातून पुरविते. या पोषण आहाराच्या पाकिटामध्ये बालकांच्या प्रकृतीसाठी पौष्टिक चिक्कीच्या वड्या असतात. नांद्राकोळी येथील अंगणवाडी क्र. ४ मध्ये १८ जून रोजी अंगणवाडी सेविकेने या पाकिटातील राजगिरा चिक्कीच्या वड्या बालकांना खाण्यासाठी दिल्या. त्यामधील एका बालकाच्या वडीमध्ये चक्क बारीक तांब्याच्या ताराचा गुच्छ निघाला. ही बाब सदर बालकाने घरी सांगितली. त्यांनतर लगेच ग्रामपंचायत सदस्य तथा अंगणवाडी समितीचे अध्यक्ष रमेश काळवाघे यांनी ग्रा.पं. सदस्यांना ही वडी दाखविली. त्यांनी भारिप बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष समाधान जाधव यांच्या कानावर घातली व या संदर्भात सर्व सदस्यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले. यापूर्वीही पोषण आहारामध्ये लोखंडी खिळे, तार निघाल्याचे बालकांनी सांगितले. आता संबंधित पुरवठादार संस्थेवर गुन्हे दाखल करण्यात यावा, अशी मागणी नांद्राकोळी येथील ग्रा.पं. सदस्यांनी केली आहे.

Web Title: Anganwadi nutrition is in the drain!