लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरात २८ ऑगस्ट रोजी सकाळी ऊन पडल्यानंतर दुपारी ३.३० वाजतानंतर पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर थोडी विश्रांती घेत पावसाने ६ वाजताच्या सुमारास शहरात जोरदार हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास शहरात धो-धो पाऊस बरसला. कोसळधार पावसामुळे अकोलेकरांची चांगलीच दाणादाण उडाल्याचे चित्र सायंकाळी पाहावयास मिळाले. शहरातील सर्वच प्रमुख मार्ग जलमय झाले होते. अनेक भागांत नाले तुंबले होते. रस्त्यावर पाणीच पाणी साचले. अनेक भागांत नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याच्या तक्रारी आल्या. पावसामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला,
शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडत आहे. विजांच्या कडकडाटांसह होत असलेल्या पावसामुळे वाहनधारकांची तारांबळ होत आहे. गुरुवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस झाला आहे. शहरातील प्रमुख मार्गावर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे अशोक वाटिका चौक, सिंधी कॅम्प, नवीन बसस्थानक चौक, टॉवर चौक, गांधी रोड, टिळक रोडवर गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. शहरातील अनेक भागांत नाले, नाल्या तुंबल्याने, घाण व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर साचले. शहरातील दुर्गा चौक ते केडिया प्लॉटपर्यंतचा रस्त्याचा तर नेहमीप्रमाणे अक्षरशः तलाव झाला होता. तापडिया नगरातील मोहन भाजी भंडारजवळील नाला तुंबून ओसंडून वाहत असल्याने रस्त्यावर सर्वत्र घाण पाणीच साचलेले दिसून आले. यासोबतच रतनलाल प्लॉट चौकात पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने गुडघाभर पाणी साचले होते. शहरातील डाबकी रोड, जुने शहर, कौलखेड, जठारपेठेतील ज्योती नगर, निबंधे प्लॉट, न्यू तापडिया नगर, मोठी उमरीतील काही भागांत घरांमध्ये पाणी शिरल्याच्या नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत.
३ फूट पाणी घरातशिवणीमध्ये असलेल्या नाल्यावर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणामुळे नाला छोटा झाला असून, नाल्यामधील पाणी नागरिकांच्या घरात शिरले. अनेकांच्या घरात २ ते ३ फुटापर्यंत पाणी होते. नाल्यातील पाण्यासोबतच सापही नागरिकांच्या घरामध्ये शिरले. सायंकाळी ७ ते १० वाजताच्या दरम्यान चार ते पाच नागरिकांच्या घरातील साप पकडण्यात आले.
घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले
- या मुसळधार पावसाने बुधवारी १ रात्री अकोलेकरांची चांगलीच दाणादाण उडवली. नाल्या तुंबल्यामुळे त्यातील सांडपाणी रस्त्यावर आले. अनेक भागांत नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याचे चित्र दिसून आले.
- जठारपेठेतील ज्योती नगरातील रहिवासी जितेंद्र कुरळकर, श्री पाटील, बावने, गणोजे, अत्तरदे यांच्या घरांमध्ये पावसाचे, नाल्यांचे पाणी शिरले होते.
- नाल्यांमधील पाण्याचा निचरा 3 होत नसल्याने हा दरवर्षीचाच त्रास असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
विजेचा खांब कोसळला; मोठा अपघात टळला!अकोला: सिंधी कॅम्प चौक येथे एसपी कार्यालयासमोरील पुलाखाली अचानक विजेचा खांब कोसळून तार रस्त्यावर पडले. त्यामुळे ओव्हरब्रिजसह अशोक वाटिका मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. शनिवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान हा प्रकार घडला. सुदैवाने वीजपुरवठा आधीच खंडित असल्याने मोठा अपघात टळला. खांब कोसळताना जवळून जात असलेली एक महिला बोडक्यात बचावली. विजेची तार रस्त्यावर पसरल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रस्त्यांवरील पाण्यातून मार्ग काढताना कसरतशहरातील लहान-मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्याची गरज असून, महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून थातूरमातूर साफसफाई होत असल्याने नाल्या तुंबत आहेत. नाल्यांमधील पाणी रस्त्यांवर आल्याने अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचत असल्याचे चित्र तर नेहमीचेच झाले आहे.
जिल्ह्यात शनिवारपर्यंत पाऊसजिल्ह्यात गुरुवारपासून शनिवार, ३० ऑगस्टपर्यंत तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविली आहे. या जिल्ह्यातील पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे नदी, नाले व तळ्यांतील पाणीसाठ्यात वाढ झाली असून, जिल्ह्यात आणखी तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आहे. त्यामुळे नदी व नाल्यांना पूर आल्यास नागरिकांनी अनावश्यक पाण्यात जाण्याचे धाडस करू नये, पूर आलेल्या रस्त्यावरून गाडी चालविणे टाळावे, पाणीसाठ्याजवळ सेल्फी काढण्याचा मोह करू नये, वीज व पावसापासून बचावाकरिता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, तसेच नदीकाठच्या परिसरातील गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. यासंदर्भात संबंधित यंत्रणांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.
केडिया प्लॉट ते उमरी रोडवर तलावशहरातील दुर्गा चौक ते केडिया प्लॉट रस्त्यावर दरवर्षीच पावसामुळे नाल्या तुंबतात आणि या नाल्यांमुळे सांडपाणी ओसंडून रस्त्यावर वाहते. त्यामुळे या रस्त्याला दरवर्षीच तलावाचे स्वरूप प्राप्त होते. अशीच परिस्थिती रतनलाल प्लॉट चौकाची आहे. कोर्टासमोरून वनविभागासमोरील रस्त्यावरही नाल्यांमधील पाणी रस्त्यावर साचल्याने तनाव तयार झाल्याचे चित्र होते.
गुडधीमध्ये घरात शिरले पाणीगुरूवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले. गावातील अनेक नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी शिरल्याने घरातील जीवनावश्यक वस्तुंचे नुकसान झाले. अनेक नागरिकांना रात्रभर घरातील पाणी बाहेर काढावे लागले. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच उमरी येथील पुलाखाली पाणी साचल्यामुळे काही वेळाकरिता वाहतूक विस्कळीत झाली होती.