Akola Live in Partner killed: २८ वर्षाच्या प्रेयसीची पवनने हत्या केली आणि पोलीस ठाण्यात जाऊन म्हणाला, 'तिने माझ्या घरात...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 15:25 IST2025-12-10T15:24:16+5:302025-12-10T15:25:36+5:30
Live in Partner Killed in Maharashtra: ७ डिसेंबर रोजी अकोला शहरात एका २८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पोलीस ठाण्यात जाऊन तिच्या मृत्यूची माहिती देणारा तरुणच आरोपी निघाला आहे.

Akola Live in Partner killed: २८ वर्षाच्या प्रेयसीची पवनने हत्या केली आणि पोलीस ठाण्यात जाऊन म्हणाला, 'तिने माझ्या घरात...'
अकोला शहरातील महेश कॉलनीमध्ये एका घरात २८ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. ७ डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. पण, तरुणीने आत्महत्या केली नव्हती, तर तिची हत्या करण्यात आली होती, असे तपासातून उघड झाले आहे. ज्या तरुणाने पोलिसांना तिच्या आत्महत्येची माहिती दिली, त्यानेच तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. मयत तरुणी आणि आरोपी तरुण हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते, असेही तपासातून समोर आले आहे.
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी पत्रकार परिषद घेऊन शहरात ७ डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेची माहिती दिली. चांडक म्हणाले की, पवन लक्ष्मण इंगळे (अविवाहित, वय २७, रा. महेश कॉलनी) याने रात्री ९ वाजता शहर पोलीस ठाण्यात येऊन तरुणीने घरात आत्महत्या केल्याची माहिती दिली होती.
प्रकरणाचा उलगडा कसा झाला?
२८ वर्षीय तरुणी आणि मी गेल्या काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले होते. त्याच्या माहितीनंतर पोलीस पथक घटनास्थळी गेले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कामी ग्रामीण रुग्णालय अकोट येथे पाठवला होता.
संबंधित तरुणीने आत्महत्या केल्याबद्दल पोलिसांना घटनास्थळावरील परिस्थिती आणि इतर काही गोष्टींवर संशय आला. त्याचवेळी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून मयत तरुणीचा शवविच्छदेन अहवाल पोलिसांना मिळाला. त्यात तरुणीचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे नमूद केलेले होते. त्यामुळे पोलिसांच्या तपासा गती मिळाली.
पवन इंगळे गुन्हा केला कबूल
या प्रकरणात संशयाची सुई पवन इंगळे याच्याकडे वळली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने प्रेयसीची हत्या केल्याची कबुली दिली. मयत तरुणीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी पवन लक्ष्मण इंगळे याला अटक केली आहे.