Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 18:00 IST2025-06-17T17:59:41+5:302025-06-17T18:00:38+5:30

Akola Crime news: एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर त्याची हत्या करण्यात आलेली असल्याचे समोर आले.

Akola: Anger arose because he refused to serve alcohol, the two beat him so much that he lost his life. | Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला

Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला

दारू पाजण्यास नकार दिल्याचा दोघांना इतका राग आला की, त्यांनी एकाचा जीवच घेतला. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात ही घटना घडली आहे. मयत व्यक्तीचा मृतदेह १० जून रोजी आढळून आला होता. पण, पोलिसांना संशय आला. त्यानंतर शवविच्छेदन अहवालातून हत्येच्या या प्रकरणाला वाचा फुटली.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पातूर तालुक्यातील विवरा परिसरात १० जून रोजी रमेश सुपाजी निंबोकार (४९) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. प्रारंभी चान्नी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदन अहवाल आणि वैद्यकीय तपासणीनंतर हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर १२ जून रोजी रात्री दोन आरोपींविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

एकाला अटक, दुसऱ्या आरोपीवर उपचार सुरू

या प्रकरणात संतोष ढोले यास अटक करण्यात आली असून, दुसरा आरोपी वैभव सहदेव पजई (रा. विवरा) हा अद्याप फरार आहे. अटकेतील आरोपी संतोष ढोले याच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात हृदयरोगासंदर्भात उपचार सुरू असून, तो पोलिसांच्या निगराणीखाली आहे. न्यायालयाने त्याची तब्येत सुधारल्यावर पोलिस कोठडीत घेण्याचे आदेश दिले आहेत. 

कशी करण्यात आली हत्या?

१० जून रोजी सायंकाळी पावणेचारच्या सुमारास नगरजवळील सोपीनाथ लिंबाच्या झाडाखाली रमेश निंबोकार बसले असताना संतोष ढोले व वैभव पजई या दोघांनी त्यांच्याकडे दारूची मागणी केली. 

रमेश यांनी नकार दिल्यामुळे रागाच्या भरात दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी व लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्यामुळे रमेश यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतकाचे बंधू सुरेश सुपाजी निंबोकार यांच्या फिर्यादीवरून चान्नी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Akola: Anger arose because he refused to serve alcohol, the two beat him so much that he lost his life.