कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 05:36 IST2025-08-09T05:36:44+5:302025-08-09T05:36:44+5:30
या दुर्घटनेने पातूर शहरात हळहळ व्यक्त होत असून, तीन वर्षांपूर्वी घडलेल्या अशाच अपघाताची आठवणही ताजी झाली आहे.

कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
पातूर (जि. अकोला) : उत्तर प्रदेशातील श्रीक्षेत्र काशी (देवकुंड) येथून गंगेचे पवित्र जल घेऊन येत असलेल्या पातूर येथील जय तपे हनुमान व्यायामशाळेच्या कावडयात्रेतील दोन शिवभक्तांचा मध्यप्रदेशातील शिवनी (बांदोल पोलिस स्टेशन हद्दीत) येथे अपघातातमृत्यू झाला, तर आठजण गंभीर जखमी झाले. ही घटना ७ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता घडली.
उत्तर प्रदेशातील श्रीक्षेत्र काशी (देवकुंड) येथून गंगेचे पवित्र जल आणून पातूर येथील कवळेश्वर महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी निघालेल्या पदयात्रेत हा अपघात घडला. यात्रेतील ट्रॅक्टरला मागून येणाऱ्या भरधाव टिप्परने (एमएच ४०-६५४०) जोरदार धडक दिली. या अपघातात अरविंद उर्फ बंडू बंड (५५, गुरुवार पेठ, पातूर) आणि अविनाश पोहरे (३३, नानासाहेबनगर, पातूर) यांचा जागीच मृत्यू झाला.
विठ्ठल थोरात, ऋषी वानखडे, बंटी सोनवणे, सचिन ढगे, कुलदीप गाडगे, पुरुषोत्तम गिऱ्हे, सतीश तायडे, पुंडलिक गाडगे हे आठजण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरकोळ जखमी गौतम उगले यांना उपचारानंतर सुटी देण्यात आली.
या दुर्घटनेने पातूर शहरात हळहळ व्यक्त होत असून, तीन वर्षांपूर्वी घडलेल्या अशाच अपघाताची आठवणही ताजी झाली आहे. आयोजक बाळू ऊर्फ अनंता बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले.