पशुखाद्याचे दर वाढले, तर दुधाचे दर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:21 AM2021-04-20T04:21:09+5:302021-04-20T04:21:09+5:30

दहिगावने : शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव, दहिगावने व परिसरातील बहुतांश शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात. सध्या पशुखाद्याचे दर वाढले ...

While the price of animal feed has gone up, the price of milk has gone down | पशुखाद्याचे दर वाढले, तर दुधाचे दर घसरले

पशुखाद्याचे दर वाढले, तर दुधाचे दर घसरले

googlenewsNext

दहिगावने : शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव, दहिगावने व परिसरातील बहुतांश शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात. सध्या पशुखाद्याचे दर वाढले असताना दुधाच्या दरात घसरण झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थसंकटात आणखी भर पडली आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शेतीला आधार तसेच शेतकऱ्यांच्या हाताला नियमित पैसे मिळवून देणारा शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. जिल्ह्याच्या बहुतांश भागातील शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. शेतकऱ्यांना मागील महिन्यांत गायीच्या दुधाला ३० ते ३५ रुपये सरासरी दर मिळत होता, तेव्हा कुठे दोन पैसे नफा मिळायचा. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि दुधाचे दर प्रतिलिटर २७ रुपयांपर्यंत कोसळले. त्यात आणखी घसरण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशातच पशुखाद्याचे दरही वाढले. १ हजार ५०० ते २ हजार रुपये टनाप्रमाणे ऊस विकत घ्यावा लागत आहे. मागील महिन्यात २ हजार ७०० ते २ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल असणारा सरकी पेंडींचा भाव आज ३ हजार ३०० ते ३ हजार ४०० रुपये क्विंटल झाला आहे. चारा, पशुखाद्यावर होणारा खर्च लक्षात घेता शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय नकोसा वाटत आहे. शासनाने याची गंभीर दखल घेत दुधाला किमान ३५ रुपये प्रतिलिटर दर द्यावा व त्यात पुन्हा घसरण होणार नाही याची दखल घ्यावी, अशी मागणी दूधउत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.

--

दुग्ध व्यवसायासाठी करावी लागणारी भांडवली गुंतवणूक, जनावरांचा खुराक, चारा, औषधोपचार आणि शेतकऱ्यांचे कष्ट यांचा सारासार विचार केला तर गाईच्या दुधाला मिळणारा २७ रुपये प्रतिलिटर हा भाव फारच कमी आहे. किमान ३५ रुपये प्रतिलिटर भाव मिळाल्यास दोन पैसे नफा शेतकऱ्यांना मिळू शकतो.

-प्रदीप गायधने,

दुग्ध व्यावसायिक, भावीनिमगाव

--

महागाईचा प्रचंड भडका उडाल्याने प्रत्येक क्षेत्रातील उत्पादनांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्या तुलनेत दुधाचे दर वाढले नसून मागील तीन वर्षांपासून सरासरी दर २५ ते ३० रुपये प्रतिलिटरपर्यंतच मर्यादित आहेत. त्यामुळे अलीकडील काळात अनेक शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे पाठ फिरविली आहे.

-शरद शेळके,

संचालक, अंबिका दूध संकलन केंद्र, भावीनिमगाव

Web Title: While the price of animal feed has gone up, the price of milk has gone down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.