Vitthalrao Vikhe Patil, promoter of rural development | वर्धापन दिन विशेषांक : ग्रामविकासाचे आद्य प्रवर्तक विठ्ठलराव विखे पाटील
वर्धापन दिन विशेषांक : ग्रामविकासाचे आद्य प्रवर्तक विठ्ठलराव विखे पाटील

ठळक मुद्दे देशालाही सहकारी संस्थांच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवण्याची प्रेरणा दिली.चौथीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांना शिक्षण सोडावे लागलेआशिया खंडातील पहिल्या शेतकरी सहकारी पतपेढीची त्यांनी स्थापना केलीबागाईतदार शेतक-यांची परिषद धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली भरली देशातील पहिली सहकारी साखर कारखान्यांची परिषद प्रवरानगर येथे ‘अखिल भारतीय सहकारी साखर कारखाना परिषद’ या नावाने झालीविठ्ठलराव विखे एकात्मिक ग्रामीण विकासाचे आद्य प्रवर्तक ठरतात.

अहमदनगर: कारखाना काढणं हा काय बाजारचा भाजीपाला आहे काय? हे दगडावर डोकं आपटण्यासारखंच आहे. ही कामं वाणी, शेठ सावकारांची. कुणब्यांनी मातीतच गाडावं. कशाला उंटाचा मुका घ्यावा?, अशा शब्दात लोकांनी फटकारल्यानंतरही आशिया खंडातील पहिली पतपेढी स्थापन करणाऱ्या विठ्ठलराव विखे यांनी साखर कारखाना काढलाच आणि देशालाही सहकारी संस्थांच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवण्याची प्रेरणा दिली.
१९१५ साली महात्मा गांधी भारतात आले आणि भारतभ्रमण करून राजकारणात सक्रिय झाले. त्यावेळी ७० टक्के लोकसंख्या खेड्यात राहत होती़ खेड्यातल्या लोेकांना जागे केल्याशिवाय स्वराज्य चळवळीला काहीच अर्थ नाही हे ज्यावेळी महात्मा गांधींच्या लक्षात आले, त्यावेळी लोणीच्या माळरानावर एक तरुण सहकाराची पेरणी करुन सर्वसामान्यांच्या आयुष्यात समृद्धीच्या अंकुराची उगवण करीत होता. विठ्ठलराव एकनाथ विखे असं या तरुणाचं नाव. १२ आॅगस्ट १८९७ रोजी लोणी (ता. राहाता) येथे विठ्ठलराव विखे यांचा जन्म झाला. त्यावेळी खेड्यातील जीवन हे विकल, हताश, पराभूत, न्यूनगंडाने पछाडलेले, रूढीग्रस्त, अंधश्रद्धाळू, शेतीवर पूर्णत: पावसावर अवलंबून. एका बाजूला अनियमित निसर्ग, तर दुस-या बाजूला सावकारी पाशात अडकलेली शेती. परंपरागत रुढीग्रस्त, अंधश्रद्धेने गांजलेला समाज. याच समाजावर आधुनिक, वैज्ञानिक, भौतिकवादी संस्कृतीचे आक्रमण करुन त्यांना जाणीवपूर्वक त्याच (अडाणी) अवस्थेत ठेवण्यासाठी पराकाष्ठा करणारी व्यवस्था. त्यामुळे एका बाजूला हरलेपणाची जाणीव तर, दुस-या बाजूला शासन यंत्रणेचे भयकारी शोषण. प्रतिकूल निसर्ग आणि जुलमी परकीय सत्ता यात होणारा कोंडमारा. अशी विदारक अवस्था ग्रामीण जनतेची होती. शालेय वयात विठ्ठलराव विखे यांनी ही परिस्थिती जवळून अनुभवली. चौथीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांना शिक्षण सोडावे लागले. वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षीच त्यांच्यावर अनेक जबाबदा-या येऊन पडल्या. त्याचे कारणही तसेच होते. त्यांच्या घरात गावाची पाटीलकी होती. मात्र, त्यांच्या चुलत्याचे निधन झाल्यामुळे पाटीलकीची जबाबदारी विठ्ठलराव यांच्यावर येऊन पडली. कमी वयात पाटील झालेले ते त्याकाळी एकमेव असावेत.
शेती दुष्काळाच्या आणि परकीय शासनाच्या दुष्टचक्रात अडकलेली़ एका बाजूला शेतकरी सावकारी कर्जाच्या ओझ्यात दबलेले तर दुस-या बाजूला व्यापाऱ्यांकडून शोषण. पिकवलेला माल व्यापारी कवडीमोल खरेदी करीत. याचा अनुभव विठ्ठलरावांना तरुण वयातच मिळाला. त्यामुळे सावकारी विळख्यातून शेतकरी बाहेर पडला पाहिजे. त्यांच्या मालाला हक्काची बाजारेपठ मिळाली पाहिजे, असे विचार ते व्यक्त करीत.
१९१८ साली नगर इलाक्यात मोठा दुष्काळ पडला होता. त्याचा लाभ उठवत लोभी सावकारांनी अडाणी व नडलेल्या शेतक-याच्या कित्येक जमिनी घशात घातल्या. हे सारे बघताना विठ्ठलराव तीळतीळ तुटत. पत हरवलेल्या, आर्थिक कुचंबनेच्या दलदलीत फसलेल्या शेतक-यांना मुक्त करायचे असेल तर इर्जिक घालायलाच लागेल, असं ते नेहमी म्हणायचे. जमीन नांगरण्यापासून ते पिकं काढणीपर्यंतची मोठी कामं करण्यासाठी अनेक शेतकरी एकाच्या शेतात एकत्र कामं करायची, त्याला इर्जिक म्हटलं जायचं़ हा सहकाराचा पहिला पाया. शेतक-यांच्या विकासासाठीही अशीच इर्जिक घालून सावकारशाही संपविण्याचा विडा विठ्ठलरावांनी उचचला.
१९०२ साली इंग्रजांनी सहकार कायदा भारतात आणला. विविध सहकारी संस्थांच्या उभारणीची प्रक्रिया सुरू झाली होती. पण शेतक-यांसाठी शेतक-यांची अशी पतपेढी कोेठेच उभी राहिली नव्हती. त्यामुळे विठ्ठलरावांनी शेतीवरची इर्जिक आता आर्थिक बाबतीत आणायची ठरवली अन् शेतक-यांसाठी शेतक-यांची पहिली पतपेढी उभी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लोकांची मनधरणी केली. २३ जानेवारी १९२३ रोजी लोणी बुद्रूक येथे आशिया खंडातील पहिल्या शेतकरी सहकारी पतपेढीची त्यांनी स्थापना केली. शेतीतल्या इर्जिकीचे सहकार चळवळीत अशा पद्धतीने त्यांनी रुपांतर केले. गरीब शेतक-यांना या पतपेढीचे सभासद करून घेतले. त्यांना खते पुरविणे, बैल घेण्यासाठी कर्ज देणे, पेंड देणे, आगंतुक खर्चासाठी आर्थिक मदत करणे अशा गरजा पतपेढीद्वारे भागविल्या जाऊ लागल्या. त्यामुळे शेतक-यांना सावकारापुढे हात पसरण्याची गरज उरली नाही. कर्जाची वसुली नियमाप्रमाणे, बिनचूक आणि सवलतीत होऊ लागली. त्यातून शेतक-यांचा आत्मसन्मान जपला जाऊ लागला. लोकांमध्ये विश्वास वाढला.
१९२६-२७ च्या दरम्यान विल्सन डॅमचे (भंडारदरा धरण) काम पूर्ण होऊन प्रवरा नदीतील पाणी पाटाद्वारे दुष्काळी भागातील जमिनीवरून खळखळू लागले. परंतु त्याचा फायदा गरीब शेतक-यांना घेता येत नव्हता. हे पाणी खाजगी साखर कारखाने व बड्या शेतक-यांसाठीच राखीव होते. धरणाचा खर्च भरून काढण्यासाठी भांडवलदारांना जमिनी देऊन साखर कारखाने काढण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण इंग्रज सरकारने घेतले होते. मेसर्स डब्लू. एच. ब्रांडी अ‍ॅण्ड कंपनी या ब्रिटिश भांडवलदार कंपनीला बेलापूर परिसरातील ७ हजार ३६७ एकर जमीन दीर्घ मुदतीच्या लीजवर सरकारने दिली. पुढे बी. एस. कामत समितीनेही खाजगी उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या शिफारशी केल्या होत्या. याशिवाय पहिल्या महायुद्धाच्या काळात साखरेची टंचाई निर्माण झाल्यामुळे देशी खाजगी साखर उद्योजकांना खास सवलती देऊन प्रोत्साहन देण्याचे सरकारी धोरण होते. त्यातूनच हरेगाव, टिळकनगर, माळीनगर, कोपरगाव येथे खाजगी कारखाने उभे राहिले. दुष्काळ, सावकारशाही यांच्या जोडीला खाजगी भांडवलदार अशी शोषणाची नवी केंद्रे वाढू लागली. त्यातच अडाणी शेतक-यांच्या जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचे पापकृत्य सरकार करू लागले. अशाही परिस्थितीत शेतकरी जो काही ऊस पिकवित त्याचा गूळ करून बाजारात विक्री करीत. मात्र, त्यालाही भाव मिळत नव्हता. अशा सर्व बाजूंनी शेतकरी नागवला जात होता. गुळाला भाव न मिळाल्यामुळे लोणीत लगड नावाच्या शेतक-याचा मृत्यू झाला.
दरम्यानच्या काळात शेतक-यांना या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी विठ्ठलरावांनी लोणी आणि परिसरात अनेक पतपेढ्या सुरू केल्या. त्यांना कारभाराची दिशा दिली. सहकाराचे महत्व पटवून दिले. आपण एकत्र आलो तर फायदा आपलाच आहे. आपल्याला कुणापुढे भीक मागण्याची गरज पडणार नाही. आपल्याला ताठ मानेनं जगता येईल हे लोकांना पटवून दिले होते. त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास येऊ लागला होता. विठ्ठलराव विखेंचे प्रस्थ वाढत असतानाच इंग्रज सरकारने त्यांना छळायला सुरुवात केली. तुम्ही नियमबाह्य शेतक-यांना कर्ज देता, त्यांच्यावर निर्बंध आणण्याचे प्रयत्नही इंग्रज सरकारने केले. मात्र, त्यांना झुगारुन विठ्ठलरावांनी काम सुरुच ठेवले. त्याचवेळी खासगी साखर कारखान्यांचे पेव फुटले होते. शेतक-यांचा ऊस कवडीमोल भावाने हे कारखाने खरेदी करीत. त्यामुळे विठ्ठलरावांनी शेतक-यांच्या मदतीनेच सहकारी कारखान्याचा विचार मांडला.
याचवेळी १७ डिसेंबर १९४५ रोजी बेलापूर (ता.श्रीरामपूर) येथे बागाईतदार शेतक-यांची परिषद धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. परिषदेत गाडगीळांनी सहकारी कारखाना सुरू करण्याचे आवाहन शेतक-यांना केले. त्याला प्रतिसाद देऊन विठ्ठलरावांनी गाडगीळांचे हे आव्हान स्वीकारले. मात्र हे काम डोंगर डोक्यावर घेण्यासारखेच होते. गावपातळीवर छोट्या पतपेढ्या काढणे ठीक, पण थेट भांडवलदारांशी बरोबरी करून कारखाना उभा करणे हे स्वर्ग-पाताळ एक करण्यासारखेच होते. परंतु लोकांचा विठ्ठलरावांवर भरवसा होता. विखेपाटील जे करतील ते योग्यच असेल, हा विश्वास त्यांनी आतापर्यंतच्या कामातून मिळविला होता. तोच त्यांना प्रेरणा देत होता.
असे असले तरी काही प्रस्थापित लोक त्यांच्या विश्वासाला तडा देत होते. कारखाना काढणं हा काय बाजारचा भाजीपाला आहे काय? हे दगडावर डोकं आपटण्यासारखंच आहे. ही कामं वाणी, शेठ, सावकारांची. कुणब्यांनी मातीतच गाडावं. कशाला उंटाचा मुका घ्यावा? हे कोरड्या विहिरीत उडी घेण्यासारखंच आहे. अशा नाउमेद करणा-या चर्चा सुरू झाल्या. अपप्रचार सुरू झाला. पाटलांचे शेअर्स घेऊ नका. तो लबाड माणूस आहे. तो काय कारखाना काढणार? त्याच्या नादाला लागू नका. पैसे दिले असतील तर ते परत घ्या, अशा वावड्या उठवून शेतक-यांना भडकावून देण्याची भाषा सुरू झाली. परंतु विठ्ठलराव मागे हटले नाही. त्यांनी तीनशे रुपयांना एक शेअर्स व एका शेतक-याला जास्तीत जास्त पंचवीस शेअर्स देण्याचे ठरविले. कारण त्यांना केवळ पैसा नको होता, तर माणसे हवी होती. शिवाय आपण मालक झाल्याची भावनाही शेतक-यांमध्ये यावी हा हेतू होता. मोठे शेतकरी पैसे देण्यास तयार होतेच. परंतु सामन्यांच्या जीवनात त्यांना बदल घडवायचा होता. तिथे श्रीमंत लोक आले तर त्यांचा सन्मान राखला जाईलच याची खात्री नव्हती.

दरम्यान सरकारी पातळीवर नोंदणी, मंजुरी, कार्यवाही यात दप्तरदिरंगाई होऊ लागली. त्यामुळे विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले. या कोंडीतून वाट काढण्यासाठी विठ्ठलरावांनी वैकुंठराय मेहता आणि धनंजयराव गाडगीळ यांची मदत घेतली़ २ सप्टेंबर १९४९ रोजी डॉ. गाडगीळांच्या अध्यक्षतेखाली पहिली सभा घेण्यात आली. सभेत शेअर्स, कारखान्याच्या कामाविषयी सभासदांना पूर्ण माहिती देण्यात आली आणि पुढील वर्षभरात म्हणजे २३ डिसेंबर १९५० रोजी भुताच्या माळावर आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झाला आणि गाडगीळांना कारखान्याचे पहिले अध्यक्ष होण्याचा बहुमान विठ्ठलरावांनी दिला. स्वत: उपाध्यक्ष म्हणून काम पाहू लागले. मशीनचा खडखडाट सुरु झाला. दाणेदार शुभ्र साखर पोत्यात भरली जाऊ लागली. एका अर्थाने तो  मानवतेच्या कल्याणासाठी नव्या युगाचा मंत्रघोष होता. वर्षानुवर्षे दारिद्र्यात चाचपडणा-या अडाणी शेतक-यांच्या आत्मसन्मानाचा तो चमत्कार होता. 
राज्यभरात सहकारी साखर कारखान्यांची चळवळ जोमात होती. नगर जिल्ह्यातही अनेक सहकारी साखर कारखान्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. देशभरातील साखर कारखान्यांची परिषद भरवावी, असा प्रस्ताव विठ्ठलरावांनी १९५६ साली मांडला. त्यानुसार देशातील पहिली सहकारी साखर कारखान्यांची परिषद प्रवरानगर येथे ‘अखिल भारतीय सहकारी साखर कारखाना परिषद’ या नावाने झाली. 
पहिली अकरा वर्षे गाडगीळ हेच कारखान्याचे अध्यक्ष झाले. तर विठ्ठलराव उपाध्यक्ष होते. लोकांच्या आग्रहाखातर १९६० साली त्यांनी प्रथम कारखान्याचे अध्यक्षपद स्वीकारले आणि पंतप्रधान पंडित नेहरु यांनाच थेट लोणीत आणले.
कारखान्याद्वारे आर्थिक स्थिरता मिळाल्यानंतर प्रवरा परिसरात नवे वारे वाहू लागले. विकासाचे चक्र गतिमान होऊन आधुनिक ग्रामीण समाजाच्या सर्वांगीण विकासाचे रोल मॉडेल म्हणून प्रवरा सहकारी साखर कारखान्याचा पुढे राज्य आणि देशभर स्वीकार झाला. ती शेतक-यांच्या स्वातंत्र्याची अहिंसक क्रांती होती. एका नव्या युगाचे प्रवर्तन होते. याच कारखान्यामुळे कृषी औद्योगिक अर्थरचनेतून नवमहाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा पाया रचला गेला. जगात समतेच्या नावाखाली रक्तरंजित क्रांतीची भाषा चालली असताना विठ्ठलराव सहकाराची दीक्षा देऊन मानवतेची द्वाही फिरवीत होते.
सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीनंतर विठ्ठलरावांनी कृषिपूरक उत्पादनाचे अनेक प्रकल्प सहकारी तत्वावर सुरू केले. शेती  संशोधन व प्रात्यक्षिक केंद्रे, मातीपरीक्षण, संकरित पशु पैदास केंद्र, दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन केंद्र, उपसा जलसिंचन योजना, जिरायत भागाला पाणी पुरवठा योजना, पाझर तलाव, सामुदायिक विहिरी, प्रवरा पब्लिक स्कूल, प्रवरा कन्या विद्या मंदिर, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरा शिक्षणोत्तेजक सोसायटी, प्रवरा मेडिकल  ट्रस्ट, प्रवरा सहकारी बँक, कामगार कल्याण केंद्र यासारख्या लोकोपयोगी संस्था सुरु करून ग्रामीण विकासाला चालना दिली. या कारखाना उभारणीतून महाराष्ट्राच्या  संस्थात्मक कार्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यातून समाजाच्या आर्थिक प्रगतीबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य विकासालाही चालना मिळाली. विठ्ठलरावांनी सहकारी साखर कारखाना सुरु करून सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवलीच़ याबरोबरच ग्रामीण भागात कृषी औद्योगिक क्रांतीचे बीजारोपण करून, सर्वांगीण ग्रामीण विकासाचे चक्र गतिमान केले. ही क्रांती केवळ ऊस उत्पादकांपर्यंत मर्यादित राहिली नाही तर, तिचे परिणाम सार्वत्रिक झाले. म्हणूनच विठ्ठलराव एकात्मिक ग्रामीण विकासाचे आद्य प्रवर्तक ठरतात.

परिचय 
जन्म : १२ आॅगस्ट इ.स. १८९७

भूषविलेली पदे 
- जन्म : १२ आॅगस्ट इ.स. १८९७
- १९२३ : लोणी येथे आशिया खंडातील पहिल्या सहकारी पतपेढीची स्थापना
- १९३० : राहुरी तालुका सुपरवायजिंग युनियनचे अध्यक्ष व को-आॅपरेटिव्ह इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष 
- १९५० : प्रवरानगर सहकारी साखर कारखान्याची स्थापना
- १९५३ : प्रवरा शिक्षणोत्तेजक सहकारी पतपेढीचे संस्थापक व अध्यक्ष
- १९५४ : कोपरगाव व कारेगाव सहकारी साखर कारखान्यांचे सन्माननीय संचालक
- १९५३-५६ : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक  समाज संस्थेचे अध्यक्ष
- १९५६ : प्रवरानगर येथे अखिल भारतीय सहकारी साखर कारखान्यांची पहिली परिषद
- १९६० : अध्यक्ष, प्रवरा सहकारी साखर कारखाना
- १९६४ : प्रवरा ग्रामीण शिक्षणसंस्थेचे आद्य प्रवर्तक
- १९६६ : संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक व अध्यक्ष
- १९६८ : साखर कामगार हॉस्पिटलचे (श्रीरामपूर) अध्यक्ष
- १९६८ : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष
- १९७१ : गोदावरी विकास मंडळाचे सदस्य
- १९७४ : प्रवरा मेडिकल ट्रस्टची स्थापना
- १९७८ : रयत शिक्षण संस्थेचे संचालक व उपाध्यक्ष
- मृत्यू :    २७ एप्रिल इ.स. १९८०


सर्वोेच्च पुरस्कार
- पद्मश्री (इ.स. १९६१), 
- डी. लिट्. (इ.स. १९७८)

लेखक -डॉ. राजेंद्र सलालकर, (लेखक विखे पाटील महाविद्यालयात प्राध्यापक)

Web Title: Vitthalrao Vikhe Patil, promoter of rural development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.