एक दिवसाच्या पर्यटनासाठीचे आकर्षण मांजरसुंबा गड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:25 AM2021-08-22T04:25:52+5:302021-08-22T04:25:52+5:30

एका दिवसाच्या भटकंतीसाठी, पर्यटनासाठी नगरमधील योग्य ठिकाण म्हणजे नगर-वांबोरी रस्त्यावरील मांजरसुंबा गड, डोंगरगण आणि गोरक्षनाथ गड. नगर-औरंगाबाद रस्त्यावर वांबोरी ...

Manjarsumba fort is an attraction for a day trip | एक दिवसाच्या पर्यटनासाठीचे आकर्षण मांजरसुंबा गड

एक दिवसाच्या पर्यटनासाठीचे आकर्षण मांजरसुंबा गड

googlenewsNext

एका दिवसाच्या भटकंतीसाठी, पर्यटनासाठी नगरमधील योग्य ठिकाण म्हणजे नगर-वांबोरी रस्त्यावरील मांजरसुंबा गड, डोंगरगण आणि गोरक्षनाथ गड. नगर-औरंगाबाद रस्त्यावर वांबोरी फाटा लागतो. पुढे पिंपळगाव माळवीच्या तलावाशेजारून येथे पोहोचता येते.

-------

मांजरसुंबा गावातून पुढे टेकडीवरील हनुमान मंदिर दिसते आणि शेजारी उजवीकडे गड. गड चढायला १५ ते २० मिनिटे पुरेशी होतात. दुरूनच नजरेस पडणारी गडावरील निजामशाही वास्तू आजही सुस्थितीत आहे. वर जाण्यासाठी आतून पायऱ्याही आहेत.

गडावर असलेली तीन मजली जीर्ण वास्तू पाहून जंजिऱ्यावरील पडलेल्या वास्तूची आठवण होते. इथे एक कबर, पाठीमागे पाण्याचे कारंजे, शेजारीच (पश्चिमेला) एक गुप्त महाल, पूर्वेला मोठा कृत्रिम तलाव व पाठीमागे उत्तरेला एक बुरूज दिसतो. येथे पूर्वी पाणी काढण्यासाठी मोट वापरली जात असावी. कारण गडाच्या मागे कातळात पाण्याचे टाके खोदलेले आहेत. त्यावर बरोबर मधोमध ही मोट लावल्याचे आढळते. मोटेचे पाणी तलावात सोडले जात असावे. त्यासाठी हत्तीचा वापर केला जात असावा. कारण आजही हा गड हत्तीची मोट म्हणूनच ओळखला जातो. या मोट वजा बुरुजाच्या खालील वास्तूत गेल्यावर खाली आणखी एक झरोका दिसतो. त्यातून खालच्या मजल्यावर एक खोली आहे व त्याखाली पाण्याचे टाके दिसतात. इथून बाहेर पडल्यावर एक पाऊलवाट मागच्या प्रवेश द्वारापासून खाली पाण्याच्या टाक्यांकडे जाते.

गडाची ही उत्तरेकडील बाजू भक्कम आहे.

गडावरून पश्चिमेला गोरक्षनाथांचा उंच डोंगर आणि पूर्वेला वांबोरी घाटाच्या पलीकडे दरीत डोंगरगण (रामेश्वर) दिसते. गोरक्षनाथ गडावर जाण्यासाठी चांगला घाटरस्ता आहे. वरती गोरक्षनाथांचे मंदिर आहे. डोंगराच्या पलीकडे विळद घाट व पायथ्याला केकताईचा निसर्गरम्य परिसर आहे.

पूर्वेकडील डोंगरगण म्हणजे हॅप्पी व्हॅली. येथे दरीत प्राचीन महादेव मंदिर आहे. येथे ठिकठिकाणी पाण्याचे नैसर्गिक झरे आहेत. रामाने-बाण-मारल्याने हे तयार झाल्याचे मानतात. दरीतील मोठी गुहा आजही सीतेची-न्हाणी (आंघोळीचे ठिकाण) म्हणून ओळखली जाते. दरीत सीताफळाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत.

(खासेराव साबळे, पिंपळगाव माळवी, ता. नगर)

-----

२१ मांजरसुंबा गड

Web Title: Manjarsumba fort is an attraction for a day trip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.