शिक्षकांचेच पगार उशिरा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:19 IST2021-05-15T04:19:46+5:302021-05-15T04:19:46+5:30

नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३ हजार ५७३ शाळा असून तेथे ११ हजार ५२८ शिक्षक कार्यरत आहेत. सध्या या शिक्षकांना ...

Why teachers' salaries are late? | शिक्षकांचेच पगार उशिरा का?

शिक्षकांचेच पगार उशिरा का?

नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३ हजार ५७३ शाळा असून तेथे ११ हजार ५२८ शिक्षक कार्यरत आहेत. सध्या या शिक्षकांना कोरोना ड्युटी दिलेली आहे. लसीकरण केंद्र, कोरोना चाचणी, गावात कोरोनाचे संशयित लोकांचे सर्वेक्षण, तसेच इतर कोरोनासंबंधी कामात शिक्षकांना सध्या सेवा बजवावी लागत आहे. असे असतानाही शिक्षकांच्या पगाराला एक ते दीड महिना विलंब होत आहे. अजूनही काही शिक्षकांचा मार्च महिन्यातील पगार झालेला नाही. यामुळे शिक्षकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. अनेकांना बँकांच्या कर्जाचे हप्ते, गाडीचे हप्ते, हॉस्पिटलचा खर्च, तसेच इतर खर्च भागवताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने फ्रन्टलाइन वर्करचा निकष विचारात घेऊन शिक्षकांचे पगार वेळेवर करावेत, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.

----------

७५ ते ८० कोटींचे महिन्याचे बजेट

जिल्ह्यात साडेअकरा हजार प्राथमिक शिक्षक आहेत त्यांच्या एका महिन्याच्या वेतनापोटी ७५ ते ८० कोटी रुपयांची रक्कम लागते. कोरोना काळामुळे गेल्या वर्षभरापासून वित्त विभागाकडून हा निधी येण्यास उशीर होतो, तसेच जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाकडून कोषागार, बँक व बँकांतून शिक्षकांच्या खात्यात जाईपर्यंतही विलंब लागतो. सध्या कर्मचाऱ्यांचे पंधरा टक्के क्षमतेने काम सुरू आहे, तसेच अनेक बँकांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्याचाही परिणाम पगार उशिरा होण्यावर होत आहे.

------------

जिल्ह्यातील जि. प. शाळा - ३५७३

एकूण शिक्षक - ११५२८

-----------

३० ते ४० दिवसांनंतर होतो पगार

चालू महिन्याचा पगार पुढील महिन्यात दहा तारखेपर्यंत होणे अपेक्षित असताना सध्या चालू महिन्याचा पगार पुढील तीस ते चाळीस दिवसांनंतर होत आहे.

---------------

वेळेवर पगार न होणे ही नेहमीचीच समस्या आहे. पगार वेळेवर न झाल्यामुळे कुटुंबाचे आर्थिक नियोजन कोलमडते. दूधवाला, किराणा, भाजीपाला, वीज बिल, फोन बिल, बँकेचे हप्ते, त्यातच अचानक आलेले कोविड-१९ चे संकट किंवा आरोग्याच्या समस्या या सर्वांना तोंड द्यावे लागते. म्हणूनच पगार वेळेवर होणे गरजेचे आहे.

- वैशाली सोनवणे, जि.प. शाळा ममदापूर

------------

जि. प. प्रशासनाकडे अनेकदा मागणी करूनही शिक्षकांचे पगार वेळेत होत नाहीत. यामुळे अनेकांचे आर्थिक गणित कोलमडते.

त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर पगारासाठी सीएमपी प्रणाली लागू करावी व दर महिन्याच्या १ तारखेलाच पगार बँकेत जमा व्हावेत अशी सर्व शिक्षकांची एकमुखी मागणी आहे.

- नीलेश देशमुख, जि. प. शाळा सतीचीवाडी, संगमनेर

-----------

शिक्षकांचे पगार उशिरा होत असल्याने कर्जाचे हप्ते उशिरा जमा होतात. त्यामुळे जास्त व्याज द्यावे लागते. विमा हप्ते थकीत झाल्याने जोखीम वाढते. शिक्षणाधिकारी यांच्या पगाराचे अकाउंट स्टेट बँकेमध्ये उघडून सीएमपी प्रणाली सुरू करावी जेणेकरून शिक्षकांच्या खात्यात पगार जमा होण्यास विलंब होणार नाही.

- विजय कदम, जि. प. कोंढवड, ता. राहुरी

Web Title: Why teachers' salaries are late?