इंजेक्शन परत करण्याचा प्रश्न येतोच कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:27 IST2021-09-08T04:27:29+5:302021-09-08T04:27:29+5:30
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट असताना गंभीर रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जात होते. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने इंजेक्शनचा मोठा तुटवडा ...

इंजेक्शन परत करण्याचा प्रश्न येतोच कुठे?
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट असताना गंभीर रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जात होते. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. त्यात जिल्ह्याला कमी कोटा मिळत असल्याने इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाइकांची खूप पळापळ झाली होती. अशा काळात बीड, नाशिक या जिल्ह्यात तेथील जिल्हा रुग्णालयाने खासगी रुग्णालयांना रुग्णांसाठी उसणे इंजेक्शन दिले होते. रुग्णांचा प्राण वाचविणे त्यावेळी आवश्यक होते; मात्र त्यावेळी घेतलेली इंजेक्शन्स परत दिली नाहीत, म्हणून बीड येथील जिल्हा रुग्णालयाने पत्र पाठवून सदरची उसनवारी परत करा, अशी पत्रं दिली आहेत. नगर जिल्हा रुग्णालयाबाबत मात्र असे काही घडले नाही, असे सूत्रांनी सांगितले.
-----------
इंजेक्शन्स दिलीच नाहीत
जिल्हा रुग्णालयात त्यावेळी इंजेक्शन उपलब्ध होती. आम्ही मागितली; मात्र जिल्हा रुग्णालयांनी आम्हाला कुठे इंजेक्शन्स दिली? असा सवाल शहरातील खासगी रुग्णालयाच्या संचालकांनी केला आहे. जी दिली नव्हती ती परत करण्याचा काहीच प्रश्न नाही, असेही डॉक्टरांनी सांगितले.
----------
वाटप होते प्रशासनाकडे
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप हे आमच्याकडे नव्हते तर जिल्हा प्रशासनाकडे होते, असे जिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. उपलब्धता आणि रुग्णसंख्या यानुसार कोटा निश्चित करून त्यावेळी इंजेक्शनचे वाटप झाले. ते इंजेक्शन्स सर्वाधिक खासगी रुग्णालयातील रुग्णांनाच दिले होते. थेट संबंधित डॉक्टरांनाच ते देण्यात आले. त्यांच्याकडून रुग्णांनी ते विकत घेतले. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाकडून देवघेवीचा प्रश्नच नव्हता, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
---
डमी क्रमांक- ११४७