अहमदनगर : जिल्ह्यातील जाणाऱ्या कल्याण-निर्मळ, नगर-सोलापूर, पैठण-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गांची कामे अनेक दिवसांपासून रखडलेली आहेत. या कामांना मुहूर्त कधी मिळणार असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
जिल्ह्यातून जाणाऱ्या महत्त्वाच्या असलेल्या कल्याण-निर्मळ राष्ट्रीय महामार्गाच्या (क्र.६१) पाथर्डी-नगर या टप्प्याचे काम २०१६ साली सुरू झाले. मात्र मेहकरी ते भुते टाकळी या ५२ कि.मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडलेल्या अवस्थेत आहे. काही भागात रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण, पूल व मोऱ्यांचे कामे अर्धवट आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने अपघातही होत आहे.
अशीच नगर-सोलापूर रस्ता चौपदरीकरणांचीही अनेक दिवसांची मागणी आहे. त्या मार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरीही मिळाली आहे. यावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक सुरू असते. त्यामुळे याचेही राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात आले. मात्र याचेही अद्याप तीन तालुक्यातील भूसंपादन जवळपास निम्म्याहून अधिक प्रमाणात रखडले आहे. भूसंपादनाची मुदत ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत आहे. त्यानंतर काम सुरू होणे अपेक्षित आहे.
तसेच अनेक दिवसांपासून पैठण-पंढरपूर पालखी मार्ग (एनएच ७५२ ई) याचे कामही भूसंपादनामुळे रखडले आहे. पैठण ते खर्डा असा दुसरा टप्पा असूनही त्याचेही काम भूसंपादनामुळे रखडले आहे.
----
तीन ठेकेदार बदलूनही काम अपूर्णच
कल्याण-निर्मळ महामार्गांतर्गत नगर-पाथर्डी रस्त्यासाठी गेल्या पाच वर्षात तीन ठेकेदार बदलूनही काम अपूर्णच राहिले. या कामासाठी १३० कोटींची तरतूद होती. मेहकरी ते भूतेटाकळी ५२ कि.मी. लांबीमधील कामे अपूर्ण आहेत. मंजूर अंदाजपत्रकाला बगल देऊन नियमबाह्य रितीने पूर्वीच्या रस्त्यावरच अर्धा फूट खोदून थेट डोंगरातील दगड, लाल माती टाकून साईडपट्ट्यांची मलमपट्टी केली जात असल्याचे दिसून येते.
-----
भूसंपादनाशिवाय कामास शेतकऱ्यांचा विरोध
पैठण-पंढरपूर महामार्गाचे काम दोन टप्प्यात सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी अगोदर भूसंपादन करा नंतरच उर्वरित काम सुरू करा, अशी भूमिका घेतल्याने हे काम बंद पडले. हा मार्ग ११५ कि.मी.चा असून त्यासाठी ५०० कोटींची तरतूद आहे. याचे काम २०१७ मध्ये सुरू झाले असून ७० टक्के कामही पूर्ण झाले आहे.
--------
नगर-सोलापूर रस्त्याच्याही अडचणी
नगर-सोलापूर महामार्गाचे कामही भूसंपादनामुळेच रखडले आहे. हे काम नगर-घोगरगाव ३९ किमी असून ५२२ कोटी रुपयांची तरतूद आहे. तसेच दुसऱ्या टप्पा घोगरगाव ते करमाळा ४१ कि.मी. असून यासाठी ६१२ काेटींची तरतूद आहे. सद्य:स्थितीत कर्जत तालुक्यात ६० टक्के, श्रीगोंदा, नगर तालुक्यात प्रत्येकी ५० टक्के भूसंपादन झाले आहे.
---
कल्याण-निर्मळ महामार्गचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. अगोदरच्या ठेकेदाराचा ठेका रद्द झाल्यावर नव्याने सध्याच्या ठेकेदाराला काम देण्यात आले. पैठण-पंढरपूर महामार्गाचे काम जमीन अधिग्रहणमुळे थांबले आहे. काही शेतकऱ्यांनी रस्ता बंद पाडला आहे. या संदर्भात प्रांताधिकारी यांच्याशी बोलणे झाले आहे. प्रशासकीय पातळीवर हा विषय गतिमान व्हायला हवा मात्र तो होताना दिसत नाही.
-अरुण मुंढे,
जिल्हाध्यक्ष, दक्षिण, भाजप
------
अहमदनगर ते टेंभूर्णी रस्ता कामाची निविदा झाली आहे. काम अद्याप सुरू झाले नाही. सध्या या रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवून वाहन चालकांना दिलासा द्यायला हवा. अमरापूर ते भिगवण महामार्गाच्या कामाची मुदत संपली असून अमरापूर ते कर्जत काम पूर्ण झाले. मात्र कर्जत ते भिगवण काम अपूर्ण आहे. तसेच अत्यंत संथ गतीने व दर्जाहीन काम सुरू आहे. हे काम कधी पूर्ण होईल हे सांगता येत नाही.
-बाळासाहेब साळुंके,
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस