प्रत्येक महिन्याला खाण्याचे तेल बदलून वापरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:25 IST2021-08-19T04:25:47+5:302021-08-19T04:25:47+5:30
सध्याच्या धावपळीच्या जगात प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे. त्यात आहार, विहार बदलत असल्याने त्याचे आरोग्यावरही परिणाम होत आहेत. अनेकजण आरोग्याच्या ...

प्रत्येक महिन्याला खाण्याचे तेल बदलून वापरा
सध्याच्या धावपळीच्या जगात प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे. त्यात आहार, विहार बदलत असल्याने त्याचे आरोग्यावरही परिणाम होत आहेत. अनेकजण आरोग्याच्या संतुलनासाठी आहारात सेंद्रीय पालेभाज्या, फळांचा वापर करतात. परंतु तेल किती खावे याचे योग्य मार्गदर्शन अनेकांना नसते. किंबहुना गृहिणींना त्याची माहिती अधिक हवी. परंतु ती नसल्याने प्रत्येकाच्या स्वयंपाकगृहात महिन्याकाठी मोठ्या प्रमाणात तेलाचा वापर होतो. अति तेल वापरामुळे चरबी वाढून अनेक व्याधींना आमंत्रण मिळते. यातही रिफाइंड तेल अधिक दुष्परिणाम करते. त्यामुळे घाण्याचे तेल किंवा फिल्टर्ड तेल वापरण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.
--------------
लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय
लाकडी घाण्यातून काढलेले तेल चिकट आणि कोणतेही केमिकल न वापरता काढलेले असते. त्यामुळे ते सर्वाधिक पोषक आणि शरीराची लवचिकता टिकवून ठेवणारे असते. या तेलामध्ये एचडीएल नावाची उपयुक्त चरबी अधिक प्रमाणात असते.
---------------
रिफाइंड तेल केमिकलयुक्त असल्याने त्यातून शरीरात आंतरिक सूज (इन्फ्लामेशन) वाढते. ज्यामुळे अनेक व्याधी जडतात. त्यामुळे या तेलाऐवजी फिल्टर्ड तेल किंवा घाण्याचे तेल वापरावे. बाजारात अनेक ठिकाणी घाण्याचे तेल उपलब्ध असते किंवा घरच्या घरी हे तेल काढण्याचेही यंत्र उपलब्ध आहेत. प्रतिव्यक्ती प्रतिदिन २० ते २५ मिलिलिटर तेलाचा वापर आहारात हवा. शिवाय दरवेळी एकच तेल न वापरता प्रत्येक महिन्यात बदलून तेल वापरल्याने विविध पोषकद्रव्ये मिळतात.
- डाॅ. सुबोध देशमुख, आहारतज्ज्ञ
--------------
कोणतेही तेल आहारात जास्त प्रमाणात वापरले तर त्याचे दुष्परिणाम होतातच. त्यामुळे आहारात तेलाचे प्रमाण योग्य हवे. साधारण चार व्यक्तींच्या कुटुंबात महिन्याला दोन ते अडीच लिटर तेलापेक्षा अधिक वापर नको. अतितेलाच्या वापरामुळे चरबी वाढते. परिणामी ह्रदयावर परिणाम जाणवतो.
- डाॅ. अभिजित पाठक, ह्रदयरोगतज्ज्ञ
-------------