अर्बन बँक कर्ज फसवणूक प्रकरणी दोषारोपपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:27 IST2021-09-08T04:27:23+5:302021-09-08T04:27:23+5:30

अहमदनगर : नगर अर्बन बँकेकडून मशिनरी खरेदीसाठी घेतलेल्या कर्जात फसवणूक केल्याने दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने ५०० पानांचे दोषारोपपत्र ...

Urban Bank files chargesheet in loan fraud case | अर्बन बँक कर्ज फसवणूक प्रकरणी दोषारोपपत्र दाखल

अर्बन बँक कर्ज फसवणूक प्रकरणी दोषारोपपत्र दाखल

अहमदनगर : नगर अर्बन बँकेकडून मशिनरी खरेदीसाठी घेतलेल्या कर्जात फसवणूक केल्याने दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने ५०० पानांचे दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केले. यात आरोपी चार डाॅक्टरांचा समावेश आहे. उर्वरित तीन आरोपींवरही लवकरच दोषारोपपत्र दाखल होईल, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी दिली.

याप्रकरणी अर्बन बँकेचे प्रमुख व्यवस्थापक महादेव साळवे यांनी ॲाक्टोबर २०२०मध्ये कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून पोलिसांनी डॉ. निलेश शेळके याच्यासह डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. रवींद्र कवडे, भास्कर सिनारे, गिरीश अगरवाल, निर्मल एजन्सीचे योगेश मालपाणी व स्पंदन मेडिकेअर, पुणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल असलेल्या डॉक्टरांनी नगर शहरात उभारलेल्या एम्स हॉस्पिटलमध्ये मशिनरी खरेदी करण्यासाठी अर्बन बँकेच्या केडगाव व मार्केट या शाखेतून सन २०१४ मध्ये २२ कोटी ९० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज घेतल्यानंतर मात्र हॉस्पिटलसाठी कोणत्याही प्रकारची मशिनरी खरेदी न करता निर्मल एजन्सी व स्पंदन मेडिकेअर या फर्मबरोबर संगनमत करून कर्जाची रक्कम डिलरच्या खात्यातून रोहिणी सिनारे व उज्वला कवडे यांच्या वैयक्तिक खात्यात ट्रान्सफर करून घेतली व त्या रकमेची परस्पर विल्हेवाट लावली. तसेच ज्या कारणासाठी कर्ज घेतले होते त्याचसाठी पैशांचा वापर न करता ही रक्कम वैयक्तिक फायद्यासाठी वापरून बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचे या फिर्यादीत म्हटले होते. पुढे आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू झाला. आर्थिक गुन्हे शाखेने सखोल तपास करून बँकेच्या कागदपत्रांची पडताळणी केली. तसेच हे कर्ज कोणी उचलले व कोणाच्या खात्यात जमा झाले याची माहिती घेतली. या प्रकरणात पुढे डाॅ. शेळके, डाॅ. श्रीखंडे, डाॅ. सिनारे व डाॅ. कवडे यांना अटक करण्यात आली. आता दोन दिवसांपूर्वी या चार डाॅक्टरांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील उर्वरित तीन आरोपींविरोधात लवकरच दोषारोपपत्र दाखल केले जाईल, अशी माहिती अपअधीक्षक सोनवणे यांनी सांगितले.

Web Title: Urban Bank files chargesheet in loan fraud case