भुयारी मार्ग ठरताहेत अडचणीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:29 IST2021-02-05T06:29:04+5:302021-02-05T06:29:04+5:30
टाकळीमियाँ-मुसळवाडी तसेच टाकळीमिया-आरडगाव या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर यापूर्वी रेल्वे गेट होते. मात्र, रेल्वेंची वाढती संख्यामुळे गेटवर वाहनांच्या लांबच लांब ...

भुयारी मार्ग ठरताहेत अडचणीचे
टाकळीमियाँ-मुसळवाडी तसेच टाकळीमिया-आरडगाव या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर यापूर्वी रेल्वे गेट होते. मात्र, रेल्वेंची वाढती संख्यामुळे गेटवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. वाहतुकीचा खोळंबा होत असे. रेल्वे प्रशासनाने दौड ते मनमाड रेल्वे मार्गावरील सर्वच ठिकाणावरील रेल्वे गेट बंद करून काही ठिकाणी उड्डाण पूल तर अनेक ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी केली. मात्र, हे भुयारी मार्ग तयार करताना, या भुयारी मार्गाची खोली व यात साठणारे पाणी काढण्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे या भुयारी मार्गात कमरे इतके पाणी साठले जाते. त्यामुळे यातुन वाहने चालविणे अशक्य होते.
टाकळीमिया ते मुसळवाडी या रस्त्यावरून पूर्वेकडील ७ ते ८ गावांच्या लोकांना राहुरी व अन्य भागात जाण्याचा प्रमुख मार्ग आहे. येथील भुयारी मार्गाशेजारून दोन्ही बाजुने पाटपाण्याच्या चाऱ्या असल्यामुळे येथे कायम पाणी साचते व वाहतूक बंद पडते. तिच परिस्थिती टाकळीमिया ते आरडगाव या रस्त्यावरील भुयारी मार्गाची आहे. पूर्वेकडील गावातील शेतकरी शेतमाल बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात. विद्यार्थ्यांना शाळा काॅलेजला जाण्या-येण्यासाठी महत्त्वाचा रस्ता आहे, परंतु या भुयारी मार्गातील पाण्यामुळे अडचण होत आहे.
.........................
उड्डाणपूल बांधण्याची मागणी
मुसळवाडी-टाकळीमिया व आरडगाव-टाकळीमिया या दोन्ही गावांच्या रस्त्यासाठी या दोन्हींच्या मध्यवर्ती ठिकाणी उड्डाणपूल होणे गरजेचे होते. या उड्डाणपुलासाठी होणाऱ्या खर्चापेक्षा दुप्पट खर्च रेल्वे प्रशासनाने या दोन्ही भुयारी मार्गासाठी केला. मात्र, लोकांच्या वाहतुकीसाठी हा खर्च सध्या तरी पाण्यात गेल्यासारखा वाटतो. रेल्वे प्रशासनाने उड्डाणपूल बांधावा, अशी मागणी या भागातील लोकांनी केली आहे.