अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

By Admin | Updated: May 3, 2017 15:03 IST2017-05-03T15:03:40+5:302017-05-03T15:03:40+5:30

घोगरगाव शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील हेमंत आप्पासाहेब बोरुडे (वय २८) हे जागीच ठार झाले

Two-wheeler dies at the accident | अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

आॅनलाइन लोकमत
श्रीगोंदा (अहमदनगर), दि़ ३ - नगर-सोलापूर मार्गावर मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घोगरगाव शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील हेमंत आप्पासाहेब बोरुडे (वय २८) हे जागीच ठार झाले तर पाठीमागे बसलेले असलम शेखलाल शेख (वय ३०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घोगरगाव बसस्थानकानजिक हेमंत बोरुडे यांचे हॉटेल आहे़ तर बाजूलाच अस्लम शेख यांचे मोबाईल शॉप आहे. मंगळवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर हेमंत बोरुडे हे आपल्या दुचाकीवरून ( एम. एच.१६. एके- ९९९०) असलम शेख याला घरी सोडविण्यासाठी निघाले होते. नगरच्या दिशेने काही अंतर पुढे गेल्यानंतर समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीस जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की, हेमंत बोरुडे हे बाजूला उडून पडले. डोक्याला मार लागल्याने ते जागीच ठार झाले. तर असलम शेख यांच्या डोक्याला, हातापायला मार लागून ते गंभीर जखमी झाले़ त्यांना नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलीस पाटील सुदाम बोरुडे यांनी श्रीगोंदा पोलिसांना घटनेची माहिती देत अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.
हेमंत बोरुडे यांचे अपघातात निधन झाल्याचे समजताच संपूर्ण घोगरगाववर शोककळा पसरली. त्यांच्यामागे, पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी सुधाकर ससाणे हे करत आहेत.

Web Title: Two-wheeler dies at the accident