श्रीगोंदा स्टेशनजवळ मालगाडीचे १२ डबे घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:19 IST2020-12-24T04:19:12+5:302020-12-24T04:19:12+5:30
श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : दौंड-मनमाड लोहमार्गावर श्रीगोंदा स्टेशनजवळ बुधवारी रात्री मालगाडीचे ४२ पैकी १२ डबे घसरले. सुदैवाने या ...

श्रीगोंदा स्टेशनजवळ मालगाडीचे १२ डबे घसरले
श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : दौंड-मनमाड लोहमार्गावर श्रीगोंदा स्टेशनजवळ बुधवारी रात्री मालगाडीचे ४२ पैकी १२ डबे घसरले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, सध्या या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.
बुधवारी रात्री १२ वाजता सिमेंटने भरलेली ही मालगाडी श्रीगोंदा रेल्वेस्टेशनपासून पुढे दोन किलोमीटर अंतरावर म्हातारपिंप्री शिवारात घसरली. यात मालगाडीचे ४२ पैकी १२ डबे घसरले. गाडी सोलापूर-दौंडमार्गे नगरकडे चालली होती. श्रीगोंदा रेल्वेस्टेशन सोडल्यानंतर हा अपघात झाला. सोलापूर विभागाचे शैलेश गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील रेल्वे आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी तातडीने दाखल झाली आहे. त्यांनी लोहमार्ग दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेतले आहे. त्यामुळे गुरुवारी रात्रीपर्यंत ही वाहतूक पूर्ववत होणार आहे.
दरम्यान, या अपघातामुळे दौंड-मनमाड लोहमार्गावरील प्रवासी वाहतूक वळविण्यात आली आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या मनमाडमार्गे मुंबईकडे तर दक्षिण भारतातून येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या कुर्डुवाडीमार्गे वळविण्यात आल्या आहेत. एकही प्रवासी रेल्वे रद्द करण्यात आलेली नाही. मात्र वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झालेली आहे.
-----------
मालगाडीचा अपघात कशामुळे झाला याची चौकशी सुरू आहे. नंतरच कारण स्पष्ट होईल. अगोदर दुरुस्तीचे काम पूर्ण करून वाहतूक सुरळीत करणे महत्त्वाचे आहे. गुरुवारी रात्री वाहतूक पूर्ववत सुरू होणार आहे.
- शैलेश गुप्ता, व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे विभाग