निकालाआधीच तंत्रनिकेतनचे ८०० अर्ज विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:17 IST2021-07-17T04:17:46+5:302021-07-17T04:17:46+5:30
चंद्रकांत शेळके अहमदनगर : यंदा शासकीय आणि खासगी तंत्रनिकेतनमधील (पॉलिटेक्निक) पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयाने ३० जूनपासून म्हणजे ...

निकालाआधीच तंत्रनिकेतनचे ८०० अर्ज विक्री
चंद्रकांत शेळके
अहमदनगर : यंदा शासकीय आणि खासगी तंत्रनिकेतनमधील (पॉलिटेक्निक) पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयाने ३० जूनपासून म्हणजे दहावीच्या निकालाआधीच सुरू केली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातून आतापर्यंत ८०० अर्जही विद्यार्थ्यांनी भरले आहेत. दहावी निकालानंतर या प्रक्रियेला गती येणार असून, यंदा तंत्रनिकेतनचे प्रवेश वाढण्याची शक्यता तंत्रनिकेतन जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
दहावीचा निकाल जाहीर होण्याची प्रतीक्षा न करता राज्यातील तंत्रशिक्षण संचालनालयाने पॉलिटेक्निकमधील विविध पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ३० जूनपासून सुरू केली. ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत आहे. ई-स्क्रूटिनी आणि सुविधा केंद्रामध्ये जाऊन कागदपत्रांची पडताळणी करण्याची सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होऊन १६ दिवस पूर्ण झाले असून, आतापर्यंत नगर जिल्ह्यात ८०० अर्ज दाखल झाले आहेत. दहावीची गुणपत्रिका नसल्याने आणि कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने अर्ज करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल थोडा कमी आहे; मात्र शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर झाल्याने आता या प्रवेशाची गती मिळणार असल्याची माहिती तंत्रशिक्षण प्राचार्यांनी दिली.
-------------
जिल्ह्यातील पॉलिटेक्निक -२७
एकूण प्रवेशक्षमता - ७५००
आतापर्यंत गेले अर्ज - ८००
अर्ज भरण्याची अखेरची मुदत - २३ जुलै
-----------
विद्यार्थ्यांना बैठक क्रमांक मिळणार शाळेतून
विद्यार्थ्यांकडे सध्या दहावीची गुणपत्रिका नाही. त्यामुळे त्यांना पदविका अभ्यासक्रमाला ऑनलाइन अर्ज करताना त्यामध्ये बैठक क्रमांक नोंदवायचा आहे; मात्र अनेक विद्यार्थ्यांकडे बैठक क्रमांकच नसल्याने त्यांची अडचण झाली आहे; परंतु हा बैठक क्रमांक आपापल्या शाळेतून मिळतो. तो विद्यार्थ्यांनी भरावा.
---------------
गेल्यावर्षी ४० टक्के जागा रिक्त
गेल्यावर्षी पदविका अभ्यासक्रमांच्या साडेसात हजार जागा होत्या; परंतु कोरोनामुळे खासगी पॉलिटेक्निकमधील सुमारे ४० टक्के जागा रिक्त राहिल्या. शासकीय पॉलिटेक्निकमधील जागा मात्र भरल्या होत्या.
-----------
दहावीच्या निकालानंतर येणार गती
शुक्रवारी दहावीचा निकाल लागला. या निकालानंतर आता या प्रवेशप्रक्रियेला गती येणार आहे. अनेक विद्यार्थी गुण प्राप्त झाल्यानंतर पुढील दिशा ठरवतात. त्यामुळे यापुढे तंत्रनिकेतनच्या जागा वाढतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
-------------
विद्यार्थ्यांच्या अडचणी काय?
कोरोनामुळे आवश्यक कागदपत्रे जमा करण्यात अडचणी येत आहेत. अनेक शासकीय कार्यालयांत उपस्थिती कमी असल्याने वेळेवर कागदपत्रे मिळत नाहीत. परिणामी, अर्ज दाखल करण्यास उशीर होत आहे.
- प्रवीण आगे, विद्यार्थी.
---------
दहावीचा निकाल लागल्यानंतर लगेच तंत्रनिकेतनला अर्ज करणार होतो; मात्र शुक्रवारी वेबसाईट न उघडल्याने निकालच मिळाला नाही. निकाल मिळाल्यावर अर्ज करणार आहे.
- अनिल सरपटे, विद्यार्थी.
-------------
३० जूनपासून तंत्रनिकेतनची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे दहावीच्या निकालाआधीच अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. अशा विद्यार्थ्यांचे गुणपत्रक आम्हीच परीक्षा मंडळाकडून घेणार आहोत. यंदा तंत्रनिकेतनच्या जागा वाढण्याची शक्यता आहे - मुकुंद सातारकर, प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन