सरकारी मदतीपासून वंचित राहण्याची जिल्ह्यातील तमाशा कलावंतांना भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:25 IST2021-08-19T04:25:34+5:302021-08-19T04:25:34+5:30

शेखर पानसरे संगमनेर : राज्यातील लोककलावंतांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. लोककलावंतांच्या ...

Tamasha artists in the district fear being deprived of government help | सरकारी मदतीपासून वंचित राहण्याची जिल्ह्यातील तमाशा कलावंतांना भीती

सरकारी मदतीपासून वंचित राहण्याची जिल्ह्यातील तमाशा कलावंतांना भीती

शेखर पानसरे

संगमनेर : राज्यातील लोककलावंतांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. लोककलावंतांच्या याद्या तयार करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. मात्र, जिल्ह्यात प्रशासनाकडून आतापर्यंत अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेकडे यादीसंदर्भात कुठलीही विचारणा झालेली नसल्याची माहिती ज्येष्ठ तमाशा कलावंत व परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी दिली.

तमाशा कलाकारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी फड मालकांनी गेल्या वर्षी नारायणगाव येथे एकदिवसीय उपोषण केले होते. तमाशा कलावंतांची सरकारकडे नोंद करावी व त्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचविल्या जाव्यात, अशी त्यांची मागणी होती. राज्यभरातील तमाशांचे फड मालक संगमनेर तालुक्यातील झाेळे येथे गेल्या महिन्यात एकत्र आले होते. यावेळी अखिल भारतीय तमाशा परिषदेची स्थापना करण्यात आली. परिषदेच्या कार्याध्यक्षा मंगला बनसोडे, तर अध्यक्ष रघुवीर खेडकर आहेत. हे दोघेही ज्येष्ठ तमाशा कलावंत आहेत. राज्यातील १३० तमाशांचे फड मालक या परिषदेशी जोडले गेले आहेत.

लोककलावंतांना राज्य सरकारने पाच हजारांची मदत जाहीर केली. कलावंतांची यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, कलावंतांना त्याबदल्यात जनजागृतीचे कार्यक्रम करावे लागणार आहेत. पाच हजारांच्या बदल्यात त्यांच्याकडून दहा कार्यक्रम करून घेतले जाणार आहेत. जिल्ह्यात तमाशाचे तीन मोठे, तर सोळा छोटे, असे १९ फड आहेत. तमाशा कलावंतांची संख्या जिल्ह्यात तीनशेहून अधिक आहे. फड मालकांसह प्रत्येक जण कोरोनाच्या संकटाच्या कात्रीत सापडला आहे. त्या प्रत्येकालाच सरकारच्या या मदतीची अपेक्षा आहे.

-----------------

राज्यात १३५ तमाशांचे फड

जळगाव, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, औरंगाबाद या जिल्ह्यांत लहान-मोठे मिळून १३५ तमाशांचे फड आहेत. राज्यात सहा ते सात हजार तमाशा कलावंत असून, ते पूर्णवेळ काम करतात. त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन केवळ तमाशा आहे. पडद्यामागे काम करणाऱ्यांची संख्या दोन हजार आहे. त्यांनाही पाच हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी अशी मागणी आहे.

-----------------

कोरोना जाणीव जागृती कार्यक्रम मोहीम राबविण्यासाठी ललित कलेचे अभ्यासक व तज्ज्ञांची निवड समिती गठित करण्यात आली आहे. मात्र, सरकारने त्यातून तमाशा फड मालक व कलाकारांना वगळले आहे. मुंबईबाहेरील एकही तमाशा अभ्यासक समितीत घेतलेला नाही. ही बाब अन्यायकारक आहे.

- डॉ. संतोष खेडलेकर, तमाशा अभ्यासक

----------------

प्रत्येक तमाशा कलावंत कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. एकही कलावंत सरकारी मदतीपासून उपेक्षित राहू नये एवढीच अपेक्षा आहे.

- रघुवीर खेडकर, अध्यक्ष अखिल भारतीय तमाशा परिषद

-------------

Web Title: Tamasha artists in the district fear being deprived of government help