कुकाणा : जेऊर हैबती (ता. नेवासा) येथील नंदीवाले समाजाचे आराध्य दैवत असलेल्या रामबाबा मंदिराशेजारील शासकीय जागेतील मुरूम व मातीचे अवैध उत्खनन करून महसूल विभागाने पंचनामा केला. तरीही संबंधित कामगार तलाठी व मंडलाधिकाऱ्यांवर कारवाई न करता महसूल विभागाकडूनच टोलवाटोलवी सुरू आहे. त्यामुळे संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अन्यथा १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनीच गावबंद आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब फुलमाळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
जेऊर हैबती येथील शासकीय जागेतील रामबाबा मंदिराशेजारील मुरूम व मातीचे जेसीबी यंत्राच्या साहाय्याने गावातील लोकांनी दीडशे ते दोनशे ब्रास उत्खनन केलेले आहे. त्यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत. शासकीय जागेतील गौणखनिज संपत्तीची चोरी होत असताना ही चोरी महसूल विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलेली होती. पंचनाम्यावेळी तलाठी, मंडलाधिकाऱ्यांनी नागरिकांशी वाद घातला होता. त्यामुळे गावकऱ्यांनी कुकाणा येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी तहसीलदारांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र, काहीच कारवाई होताना दिसत नाही, असे निवेदनात म्हटले आहे.