कोणाच्या नाकात शेंगदाणा, तर कोणी गिळले नाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:25 IST2021-09-09T04:25:32+5:302021-09-09T04:25:32+5:30

------------ लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोणाच्या नाकात शेंगदाणा गेला तर कोणी पैसे गिळले. कोणाच्या कानात हरभरा गेला तर ...

Some have peanuts in their noses, some have swallowed coins | कोणाच्या नाकात शेंगदाणा, तर कोणी गिळले नाणे

कोणाच्या नाकात शेंगदाणा, तर कोणी गिळले नाणे

------------

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : कोणाच्या नाकात शेंगदाणा गेला तर कोणी पैसे गिळले. कोणाच्या कानात हरभरा गेला तर कोणी पाटीवरली पेन्सील व खोडरबरही गिळल्याचे प्रकार नगरमध्ये घडले आहेत. पालकांच्या नजरा चुकवून मुलांचे उद्योग पालकांना चांगलेच तापदायक असल्याचे दिसून आले आहे. मात्र, आता डॉक्टरांकडे अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध झाल्याने सहज उपचार उपलब्ध असले तरी नाकाद्वारे फुफ्फुसात काही वस्तू गेल्या तर त्या मुलांच्या जीवाला धोकाही ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

लहान मुले काय खातील आणि काय गिळतील, याचा काहीच नेम नसतो. पालकांचे थोडे दुर्लक्ष झाले की खेळता खेळता मुले काहीतरी नाका-तोंडात घालतात. खिळा, नाणे, सेप्टी पिन गिळाल्याची अनेक उदाहरणे नगरमध्ये घडली आहेत. मात्र, स्कोपीच्या मदतीने गिळलेल्या वस्तू सहजपणे बाहेर काढणे आता शक्य झाल्याने डॉक्टर आणि पालकांची चिंताही काही अंशी कमी झाली आहे. कोणतीही शस्त्रक्रिया न करता वस्तू नाका-कानातून काढणे शक्य झाले आहे.

----------

अशी घ्या काळजी

तज्ज्ञांच्या मते लहान मुलांच्या हाती नाणी, पिन, खिळा अशा वस्तू लागणार नाहीत, किंवा या वस्तू मुले तोंडात टाकणार नाहीत, याकडे लक्ष देणे आवश्यक असते. लहान मुलांनी काही जरी गिळले तरी त्वरित डॉक्टरांकडे नेणे गरजेचे आहे. एखादी वस्तू पोटात गेली तर केळी, ब्रेड, भात खाऊ घातला जातो. अशामुळे ती वस्तू आणखी आत जाते आणि गुंतागुंत वाढते आणि रुग्णाला जास्त त्रासदायक ठरते.

-------------

अनेक मुलांनी हरभरा, शेंगदाणा, खोडरबर, नाका-तोंडात घातल्याची अनेक उदाहरणे आहेत. काल परवाच एका मुलाने त्याच्या आजीच्या मधुमेहाच्या चार गोळ्या खाल्ल्या होत्या. लहान मुलांचे हे प्रताप वय वर्ष १ ते ४ या काळातच होतात. मुलांच्या आईंचे थोडे दुर्लक्ष झाले की मुले खेळता खेळता नाका-तोंडात वस्तू टाकतात. एखादी वस्तू फुफ्फुसात गेली तर मुलांच्या जीवाला धोकाही ठरू शकतो. त्यामुळे पालकांनी लक्ष देणे गरजेचे असते.

-डॉ. सूचित तांबोळी, बालरोगतज्ज्ञ

--------------

शेंगदाणा नाकात जाणे नित्याचे

शेंगदाणा नाकात गेला, असे प्रकार लहान मुलांमध्ये नित्याचेच असतात. पालकांची औषधे, गोळ्याही मुले खातात. पाटीवरली पेन्सील गिळण्याचे प्रकार आधी खूप होते. खोडरबर गिळणाऱ्या मुलांचे प्रमाणही मोठे होते. एक रुपयाचे नाणेही गिळणारी अनेक मुले नेहमीच डॉक्टरांकडे येतात. त्यामुळे पालक अधिकच चिंताग्रस्त होतात, असे विविध ठिकाणी दिसून आले आहे.

-------

अत्याधुनिक दुर्बिणीचा वापर

पोटात गेलेली वस्तू बाहेर काढण्यासाठी पूर्वी शस्त्रक्रिया केली जायची. आता अनेक अद्ययावत यंत्रे उपलब्ध झाली आहेत. परंतु यासाठी अनुभव आणि कौशल्य महत्त्वाचे आहे. शहरातील अनेक डॉक्टर एन्डोस्कोपीच्या मदतीने गिळलेल्या वस्तू बाहेर काढतात. एका दवाखान्यात वर्षभरात पाच-सहा प्रकरणे येतात, असे येथील तज्ज्ञांनी सांगितले.

-------

Web Title: Some have peanuts in their noses, some have swallowed coins