एक एप्रिलपासून शिवभोजन थाळी दहा रुपयांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:20 IST2021-03-26T04:20:29+5:302021-03-26T04:20:29+5:30

अहमदनगर : कोरोना लॉकडाऊन काळात दहाऐवजी शिवभोजन थाळीचा दर पाच रुपयांना करण्यात आला होता. त्याची मुदत ३१ मार्चला संपणार ...

Shivbhojan plate from April 1 for ten rupees | एक एप्रिलपासून शिवभोजन थाळी दहा रुपयांना

एक एप्रिलपासून शिवभोजन थाळी दहा रुपयांना

अहमदनगर : कोरोना लॉकडाऊन काळात दहाऐवजी शिवभोजन थाळीचा दर पाच रुपयांना करण्यात आला होता. त्याची मुदत ३१ मार्चला संपणार आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे शिवभोजन थाळीचा दर १ एप्रिलपासून दहा रुपयांना करण्यात येणार आहे. जिल्ह्यातही याच दिवसापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाने २६ जानेवारी २०२० रोजी गरीब आणि गरजू लोकांना स्वस्त दरात भरपेट जेवण घेता यावे, यासाठी शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. त्यासाठी ही थाळी १० रुपये एवढ्या सवलतीच्या दरात करण्यात आली होती. मात्र तीन महिन्यांमध्येच कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. लॉकडाऊन सुरू झाला. लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित, बेघर, गरीब, बाहेरगावचे विद्यार्थी यांचे जेवणासाठी हाल होऊ नयेत, यासाठी राज्य शासनाने १० ऐवजी शिवभोजन थाळीचा दर १० ऐवजी ५ रुपये करण्यात आला होता. सुरुवातीला ३० मार्च २०२० रोजी तीन महिन्यांसाठी ५ रुपये दर राहील, असा आदेश होता. मात्र लॉकडाऊन वाढत गेल्याने वेळोवेळी आदेश देऊन पाच रुपये या दरात थाळी देण्याबाबत मुदतवाढ दिली होती. शेवटच्या आदेशाची मुदत ३१ मार्च २०२१ रोजी संपत आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून शिवभोजन थाळीचा दर १० रुपये करण्याचा आदेश राज्य शासनाने दिला आहे. याबाबत राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने एक आदेश काढून अवगत करण्याबाबत सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली.

--------------------

जिल्ह्यात २९ शिवभोजन केंद्र

जिल्ह्यात सुरुवातीपासून कार्यरत असलेले २९ शिवभोजन केंद्र आहेत. या सर्व केंद्रांवर आता दहा रुपयांना थाळी मिळणार आहे. त्यामुळे गरीब, गरजू लोकांनी शिवभोजन केंद्रांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

--------------

फाईल फोटो- शिवभोजन थाळी

Web Title: Shivbhojan plate from April 1 for ten rupees