तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना : अजित पवारांची भाजप-सेनेवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 13:52 IST2019-08-08T13:22:28+5:302019-08-08T13:52:25+5:30
370 कलम हटवण्याचा निर्णय योग्यच आहे. आमचा त्याला पाठिंबा आहे. जम्मू काश्मीरच्या विकासाला यामुळे चालना मिळेल. लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना : अजित पवारांची भाजप-सेनेवर टीका
शिर्डी: राज्यातील कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. सरकारच्या विरोधात शिवस्वराज्य यात्रा आहे. आम्ही समविचारी पक्षांना सोबत घेणार आहोत. शिवसेनेने अनेकदा भाजपावर टीका केली आहे. ‘तुझं माझं जमेना अन तुझ्यावाचून करमेना’ अशी भाजपा सेनेची अवस्था झाल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.
शिर्डी येथे शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीचा परिसर महापुराने त्रस्त आहे. सरकारचा भोंगळा कारभार यास कारणीभूत आहे. गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता असताना अशी स्थिती कशी.? नियोजन नसल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. वेळोवेळी माहिती घेऊन कार्यवाही करणे गरजेचे आहे. डोक्यावरून पाणी वाहायला लागल्यावर सरकार जागे झाले आहे.
आज बेरोजगारीचं संकट दररोज वाढत आहे. भाजप सेनेच्या कालावधीत शेतकरी संपावर जात आहेत. जनतेला विश्वास देण्यात सरकार अपयशी आहे. युती सरकारने राज्याला कर्जबाजारी केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला काय तीन वर्षे लागतात का ? सांगली, कोल्हापूरची परिस्थिती सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे उद्भवली आहे. आता केवळ सरकार याचा सामना करू शकत नाही. सर्वांनी मिळून याचा सामना करण्याची गरज आहे. सरकारने अनेकांच्या मागे चौकशा लावून धाक दाखवला आहे. आपल्याला त्रास होऊ नये, म्हणून अनेक जण भाजपात जात आहेत.
370 कलम हटवण्याचा निर्णय योग्यच आहे. आमचा त्याला पाठिंबा आहे. जम्मू काश्मीरच्या विकासाला यामुळे चालना मिळेल. लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची गरज आहे. सगळी परिस्थिती बघून पाऊल उचलणं गरजेचं आहे. अपयश झाकण्यासाठी भाजपाची महाजनादेश यात्रा असल्याचीही टीका पवार यांनी केली.