शाळांची घंटा वाजणार ग्रामपंचायत, पालकांच्या ‘एनओसी’नंतरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST2021-07-14T04:24:24+5:302021-07-14T04:24:24+5:30

चंद्रकांत शेळके अहमदनगर : ग्रामपंचायत आणि पालकांनी ना हरकत दिल्यानंतरच शाळा सुरू होणार आहेत. मात्र, अद्याप नगर जिल्ह्यात एकाही ...

The school bell will ring only after the Gram Panchayat, the parents' NOC | शाळांची घंटा वाजणार ग्रामपंचायत, पालकांच्या ‘एनओसी’नंतरच

शाळांची घंटा वाजणार ग्रामपंचायत, पालकांच्या ‘एनओसी’नंतरच

चंद्रकांत शेळके

अहमदनगर : ग्रामपंचायत आणि पालकांनी ना हरकत दिल्यानंतरच शाळा सुरू होणार आहेत. मात्र, अद्याप नगर जिल्ह्यात एकाही ग्रामपंचायतीने किंवा पालकाने संमती दिलेली नाही. तशी माहिती अद्याप माध्यमिक शिक्षण विभागाकडे आलेली नाही. दरम्यान, नगर जिल्ह्यात ८४९ गावे कोरोनामुक्त झाली आहेत.

कोरोनामुक्त गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी शासन निर्णय काढला असून त्यानुसार शाळा सुरू करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या ठरावावर, तसेच पालकांच्या संमतीवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे शाळांची घंटा आता ग्रामपंचायतींच्या ठरावावर अवलंबून आहे. यावर्षीही कोरोनाचे संकट कायम असल्यामुळे शैक्षणिक सत्र सुरू झाले असतानाही शाळा मात्र विद्यार्थ्यांविना सुरू आहेत. ज्या ग्रामपंचायती माध्यमिक शाळा सुरू करण्यासंदर्भात ठराव घेतील, त्याच गावात आता शाळा सुरू होणार आहेत. नगर जिल्ह्यात एकूण १५९६ गावे असून त्यातील ८४९ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. जिल्ह्यात आठवीपासून बारावीपर्यंत सुमारे बाराशे शाळा आहेत. यातील एकही शाळा अद्याप सुरू झालेली नाही.

------------------

जिल्ह्यातील एकूण शाळा - ५३७६

शासकीय शाळा - ३१

अनुदानित शाळा - १००५

विनाअनुदानित शाळा - ७१५

एकूण गावे - १५९६

सध्या कोरोनामुक्त असलेली गावे -८४९

------------

तालुकानिहाय कोरोनामुक्त गावे

अकोले - १०६

संगमनेर - १०१

कोपरगाव - ५६

राहाता - ३२

श्रीरामपूर - २९

राहुरी - ४८

नेवासा - ३९

शेवगाव - ७५

पाथर्डी - ५९

जामखेड - ४७

कर्जत - ७१

श्रीगोंदा - ४०

पारनेर - ६३

नगर - ८३

------------

एकूण - ८४९

---------------

आतापर्यंत एकाही गावाचा ठराव नाही

नगर जिल्ह्यात १५९६ गावे आहेत. त्यापैकी किती गावांनी शाळा सुरू करण्याबाबत ठराव दिला याची माहिती अद्याप माध्यमिक शिक्षण विभागाकडे आलेली नाही. त्यामुळे किती शाळा सुरू होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

--------------

पालकांचा होकार

गेल्या दीड वर्षांपासून ॲानलाईन शाळा सुरू असल्याने विद्यार्थी कंटाळले आहेत. सुरक्षिततेचे नियम पाळून शाळा सुरू करण्यास हरकत नाही. विद्यार्थी शाळेत जायला तयार आहेत. पालकांचीही त्यास संमती आहे.

- गौरी राहाणे, पालक.

--------------

कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्यास हरकत नाही; परंतु तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना शाळा सुरू करण्याबाबत पालकांमध्ये संभ्रम आहे. शाळेने व्यवस्थित काळजी घेऊन शाळा सुरू करावी.

- हेमंत पाटील, पालक.

-----------------

कोरोनामुक्त गावांमध्ये किती शाळा सुरू होणार याबाबत ग्रामपंचायतींचे ठराव किंवा पालकांचे संमतीपत्र घेण्याबाबतच्या सूचना तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याची माहिती अद्याप तालुकास्तरावरून आलेली नाही; परंतु लवकरच ती प्राप्त होईल. त्यानुसार शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल.

- रामदास हराळ, शिक्षणाधिकारी, माध्यमिक.

Web Title: The school bell will ring only after the Gram Panchayat, the parents' NOC