आरटीओ कार्यालयातील कामे झाली ऑनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:26 IST2021-08-18T04:26:42+5:302021-08-18T04:26:42+5:30
परिवहन विभागाने आता काही चांगले धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. नागरिकांना कमीत कमी वेळात वाहनासंबंधीची कागदपत्रे उपलब्ध होतील यासाठी ऑनलाईन ...

आरटीओ कार्यालयातील कामे झाली ऑनलाईन
परिवहन विभागाने आता काही चांगले धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. नागरिकांना कमीत कमी वेळात वाहनासंबंधीची कागदपत्रे उपलब्ध होतील यासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध करून दिली आहे. वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना, दुचाकी व चार चाकी वाहनांची नोंदणी ही कामे ऑनलाईन करता येतात. त्याशिवाय मालवाहतूक करणार्या वाहनांना ऑनलाईन कर भरण्याची सुविधा सुरू झाली आहे. सर्व नव्या वाहनांची नोंदणी प्रक्रिया वाहनांच्या शोरूमद्वारे केली जाते. त्यामुळे ग्राहकांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये येण्याची आता कोणतीही गरज राहिलेली नाही.
---------
केवळ ही कामे ऑफलाईन
नागरिकांना वाहनांचे पासिंग तसेच परवान्यासाठी द्यावी लागणारी चाचणी यासाठी परिवहन कार्यालयात जावे लागते. अन्य सर्व कामे मात्र ऑनलाईन सुरू झाली आहेत.
----------
एजंटगिरीला चाप
बहुतांशी कामे ऑनलाईन सुरू झाल्यामुळे परिवहन कार्यालयातील एजंटगिरीला चाप बसला आहे. त्यामुळे नागरिकांची आर्थिक पिळवणूक कमी झाली आहे. परिवहन विभागाच्या धोरणामुळे आरटीओ कार्यालय हे एजंट मुक्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
-----------
नागरिकांकडून मिळते खतपाणी
आरटीओ कार्यालयातील कामे ऑनलाईन झाली असली तरी अजूनही काही नागरिक एजंटांकडून कामे करून घेत असल्याचे दिसत आहे. वेळ वाचविण्यासाठी अधिकचे पैसे देऊन एजंटांकडून कामे करून घेण्याचा त्यांचा कल आहे. त्यामुळे एजंटगिरीला आपसूकच खतपाणी मिळत आहे.
-----------
आरटीओ कार्यालयातील सर्व प्रमुख कामे ऑनलाईन पार पडतात. केवळ पासिंग आणि चाचणीकरिता कार्यालयात यावे लागते.
-गणेश डगळे, सहायक परिवहन अधिकारी, श्रीरामपूर.
---------
स्टार १०६१