श्रीगोंदा : मढेवडगाव (ता. श्रीगोंदा) ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एम.एम. गुरव यांनी ग्रामपंचायतीचे प्रोसिडिंग बूक, इतर कागदपत्रे, शिक्के लंपास केले आहेत, अशी तक्रार सरपंच महानंदा फुलसिंग मांडे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
त्याअगोदर सरपंच महानंदा मांडे, उपसरपंच दीपक गाडे यांनी ग्रामपंचायतीची कागदपत्रे असलेले कपाट सील केले आहे. हा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला. त्यानंतर गटविकास अधिकारी गोरक्ष शेलार यांनी ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली.
ग्रामपंचायतीने एका गटाची मोजणी करण्यासाठी भूसंपादन कार्यालयास पैसे भरले होते. शुक्रवारी मोजणीचे अधिकारी आले. मात्र ग्रामविकास अधिकारी एम. एम. गुरव गैरहजर राहिले. त्यावर सरपंच व उपसरपंच चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी ग्रामपंचायतीचे कपाट उघडले असता प्रोसिडिंग बूक, इतर कागदपत्रे, शिक्के नव्हते. त्यामुळे त्यांनी गटविकास अधिकारी गोरक्ष शेलार यांच्याकडे तत्काळ ग्रामविकास अधिकाऱ्यांबाबत तक्रार केली.
----
ग्रामपंचायतीने खासगी क्षेत्राची मोजणी करण्यासाठी पैसे भरले होते. मोजणी अधिकाऱ्यांनी मोजणीच्या वेळी हजर राहण्याबाबत पत्र दिले नव्हते. शिवाय त्याच दिवशी वडिलांची पित्र असल्याने रजा टाकली होती. कागदपत्रे पळविण्याची तक्रार खोटी आहे.
एम. एम. गुरव,
ग्रामविकास अधिकारी, मढेवडगाव