पोतराज पुत्राने ओढला परिस्थितीवर आसूड

By Admin | Updated: June 18, 2014 01:23 IST2014-06-18T00:46:44+5:302014-06-18T01:23:53+5:30

कर्जत : वर्षातील दहा महिने गावोगाव दारोदार जाऊन मरिआईचा रथ डोक्यावर घेऊन, अंगावर कोडे मारून उपजीविका करणाऱ्या माता- पित्याच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळवले.

Potujraj son approached the situation | पोतराज पुत्राने ओढला परिस्थितीवर आसूड

पोतराज पुत्राने ओढला परिस्थितीवर आसूड

कर्जत : वर्षातील दहा महिने गावोगाव दारोदार जाऊन मरिआईचा रथ डोक्यावर घेऊन, अंगावर कोडे मारून उपजीविका करणाऱ्या माता- पित्याच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळवले. शिवाय दामोदर एका डोळ्याने अंध आहे. त्याच्या या यशाबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच.
इयत्ता दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. कर्जत येथील समर्थ विद्यालयाचा दामोदर दुर्गाप्पा पवार या विद्यार्थ्याने ९० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला.
दामोदर पवार हा मुळचा राहणार पेनूर, ता.मोहळ, जि.सोलापूर येथील आहे. तो भटक्या समाजातील आहे. त्याचे आई-वडील उपजीविकेसाठी वर्षातील दहा महिने बाहेर गावीच असतात. मुलगा शिक्षणात हुशार आहे मग त्याला कोठे ठेवायचे हा प्रश्न त्याच्या आई-वडिलांना पडला.
दामोदरचे मामा आमदार राम शिंदे यांचे अंगरक्षक होते. त्यांच्या शिफारशीने त्याला समर्थ विद्यालयात घातले व सिद्धार्थ बोर्डिंगमध्ये प्रवेश दिला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्याने शिक्षण घेतले. दहावीत ९० टक्के गुण मिळवले.
दामोदर एका डोळ्याने अंध आहे हे विशेष. या विद्यालयातील विद्यार्थ्यांचा निकाल मुख्याध्यापकांनी पाहिला. दामोदरचा पहिला नंबर आला आहे ही बाब त्यांनी संस्थेचे अध्यक्ष नामदेव राऊत व वस्तीगृहाचे अधीक्षक लालासाहेब वाघमारे यांच्या कानावर घातली. या बातमीने सर्वांनाच आनंद वाटला. सर्वांनी दामोदरला शाबासकीची थाप
दिली.
प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करत यश मिळाले. त्याचे हे यश त्याच्या डोळ्यातील आनंदाश्रूतून दिसत होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Potujraj son approached the situation