साईचरणी सव्वा ३ लाखांची नवी बाईक अर्पण; संस्थानकडे आत्तापर्यंत एवढी वाहने जमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 14:07 IST2023-12-28T13:55:05+5:302023-12-28T14:07:29+5:30
अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव येथील टीव्हीएस मोटर कंपनीने सव्वा तीन लाख रुपयांची टीव्हीएस कंपनीची नवीन बाईक साईचरणी अर्पण केली आहे.

साईचरणी सव्वा ३ लाखांची नवी बाईक अर्पण; संस्थानकडे आत्तापर्यंत एवढी वाहने जमा
अहमदनगर - शिर्डीतील साईबाब संस्थानकडे कोट्यवधींचे दान दिले जाते. साईबाबांवरील श्रद्धा आणि भाविकांच्या इच्छेने साईबाबांच्या चरणी सोनं, पैसा, दागिन्यांसह अनेक वस्तू भाविक दान करत असतात. या दान झालेल्या रकमेतून संस्थानतर्फे सामाजिक आणि विधायक कार्य केले जाते. अनेक बड्या सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्य भाविक भक्तांचीही साईबाबांवर अपार श्रद्धा आहे. त्यामुळेच, साईबाबांच्या दर्शनाला मोठी गर्दी होत असते. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाही भाविक साईंच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. तत्पूर्वी टीव्हीएस कंपनीकडून लाँच करण्यात आलेली नवीन बाईक साईचरणी अर्पण करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव येथील टीव्हीएस मोटर कंपनीने सव्वा तीन लाख रुपयांची टीव्हीएस कंपनीची नवीन बाईक साईचरणी अर्पण केली आहे. टीव्हीएस कंपनीची जीही नवीन मोटर बाईक येथे, ती आम्ही साईचरणी दान करतो. आत्तापर्यंतची ही १० वी दुचाकी गाडी आहे, तर एक तीनचाकी मालवाहू अशी एकूण ११ वाहने या १० वर्षांत साईचरणी अर्पण केली आहेत, असे टीव्हीएसचे संचालक वीरेंद्र भांडारकर यांनी सांगितले. ३१० सीसी आपाची रेंसींग बाईकचे नवीन मॉडेल लाँच झालेले आहे,
साईबाबा संस्थानकडून विधीवत पूजा करुन हे दान स्वीकरण्यात आले आहे. आत्तापर्यंत साईबाबा संस्थानला वेगवेगळ्या कंपन्यांकडून एकूण १६ वाहने प्राप्त झाल्याची माहिती, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी सांगितले. दरम्यान, साई चरणी मोठ्या प्रमाणात दान केले जाते. भाविक भक्तांकडून दानपेटीत गुप्तदानही केले जाते. मंदिर संस्थानकडून दानपेटी उघडल्यानंतर गुप्तदानाची माहिती होते. त्यामध्येही, सोनं, पैसे, मौल्यवान वस्तू किंवा चेक स्वरुपातही दान दिले जाते. शिर्डीतील साईबाबा हे देशातील महत्त्वाच्या देवस्थानपैकी असून देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.