मकर संक्रांतीनिमित्त देवस्थळी सुवासिनींची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:17 IST2021-01-15T04:17:59+5:302021-01-15T04:17:59+5:30

तीसगाव : सूर्य मकर राशीत संक्रमित होण्याचा पर्वणी कालखंड प्रथमच ग्रामपंचायत मतदानाच्या पार्श्वभूमीवर एक दिवस आधीच आला आहे. त्यामुळे ...

On the occasion of Makar Sankranti, Suvasini's mandial at Devasthali | मकर संक्रांतीनिमित्त देवस्थळी सुवासिनींची मांदियाळी

मकर संक्रांतीनिमित्त देवस्थळी सुवासिनींची मांदियाळी

तीसगाव : सूर्य मकर राशीत संक्रमित होण्याचा पर्वणी कालखंड प्रथमच ग्रामपंचायत मतदानाच्या पार्श्वभूमीवर एक दिवस आधीच आला आहे. त्यामुळे पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील श्रीक्षेत्र मढी, मायंबा, वृद्धेश्वर, हनुमान टाकळी, धामणगाव देवीचे आदी ठिकाणी देवस्थळ सुवासिनींच्या मांदियाळी फुलून गेली. हळदी-कुंकवाचं लेणं देत लसीची ढाल सक्षम होऊ दे, देवराया कोरोनाचा भोग सरू दे, अशी आर्त प्रार्थना या पाचही देवस्थळी सुवासिनींनी केली.

एकमेकींनी वाणांची भेट, ओवशांनी ओटी भरतानाच मतांचे कसे काय, अशा आशयाचे सुवासिनींचे संवाद देवद्वारी चांगलेच रंगले. स्वयंभू शिवलिंगाच्या पौराणिकस्थळी गव्हाच्या ओंब्या, ओला हरभरा, ऊस, बोरे, बिब्याची फुलं, भुईमुगाच्या शेंगा, अशा शेती उत्पादनाचा एकत्रितचा ओवसा संक्रांतीला अर्पण केला जातो. सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत यावर्षीचा संक्रांतीचा पर्वणीकाळ होता. त्यामुळे वृद्धेश्वर क्षेत्री सुवासिनींची सर्वाधिक गर्दी होती. देवस्थानच्या ज्ञानवापी बारवेचा परिसर अक्षरशः फुलून गेला होता. मायंबा येथे धोंडाई मंदिराच्या घाटावर नववधूंनी हळदी-कुंकवाचे क्षण सामूहिक साजरे करीत ते सेल्फीत बंदिस्त केले.

श्रीक्षेत्र मढी, घाटशिरस, धामणगाव येथील देवस्थानमधील काही विद्यमान विश्वस्त, ग्रामपंचायतीला उभे आहेत. काही ठिकाणी त्यांचे समर्थन असलेली मंडळे निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे आचारसंहिता भंगाच्या भीतीने ते देवस्थान परिसराकडे फिरकलेच नाहीत. नैमित्तिक महापूजा, महाभिषेक पूजाऱ्यांच्याच हस्ते विधिवत झाले.

वृद्धेश्वर, मायंबा, मढी, अशी परतीची गर्भगिरी परिक्रमा करीत दुपारनंतर भाविक निवडुंगेमार्गे हनुमानटाकळीला आले. ऊस वाहतुकीच्या बैलगाड्या व इतर वाहनांच्या गर्दीत भाविकांच्या वाहनांची भर पडली. त्यामुळे वृद्धेश्वर कारखाना-कासारपिंपळगाव रस्त्यावर वाहनकोंडीचे प्रकार घडले.

Web Title: On the occasion of Makar Sankranti, Suvasini's mandial at Devasthali