नगरमधील तरुणाच्या हत्येचे गूढ उकलले: डॉक्टर असलेला भाऊच निघाला आरोपी; कसा झाला उलगडा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 16:06 IST2025-03-12T16:05:49+5:302025-03-12T16:06:24+5:30
सुरुवातीला हे प्रकरण वेगळे असल्याचा संशय होता. परंतु, चौकशीत विसंगती आढळून आल्याने पोलिसांना संशय आला.

नगरमधील तरुणाच्या हत्येचे गूढ उकलले: डॉक्टर असलेला भाऊच निघाला आरोपी; कसा झाला उलगडा?
Ahilyanagar Crime : पाथर्डी तालुक्यातील सातवड येथील तरुणाच्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. दारू पिऊन आई व स्वतःच्याच मुलाला मारहाण करत असल्याने डॉक्टर असलेल्या सख्ख्या भावानेच त्याचा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. अशोक रामराव पाठक असं अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सोमनाथ रामराव पाठक यांचा मृतदेह सोमवारी सकाळी संत्र्यांच्या शेतात आढळून आला होता. मयत झालेला सोमनाथ याला दारू पिण्याचे व्यसन होते. तो आई व स्वतःच्या मुलाला सतत मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत असे. रविवारी डॉक्टर असलेला भाऊ त्याला समजावून सांगण्यासाठी सातवडला गेला होता. त्याच्यासमोरच सोमनाथ याने आई व स्वतःच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. या रागातून डॉक्टरने सोमनाथ याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर सोमनाथ हा संत्र्यांच्या शेतात पळाला.
डॉक्टरने पाठलाग करत पकडून त्याला संत्र्याच्या झाडाला बांधले. त्याची हालचाल थांबल्याने डॉक्टर तेथून निघून गेला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने डॉक्टरचा शोध घेऊन त्याला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील तपास पाथर्डी पोलिस करत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, सुरेश माळी, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले आदींच्या पथकाने केली.
आईला दिसला मृतदेह
मयत सोमनाथ यांच्या आई सिंधूताई पाठक या सोमवारी पहाटे मोटार चालू करण्यासाठी गेल्या असता त्यांना मुलाचा मृतदेह संत्र्याच्या शेतात दिसला. त्यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आहेर यांनी घटनास्थळी भेट देता गुन्ह्याचा छडा लावला.
भावाला लागले दारूचे व्यसन
डॉक्टरने भावाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यासमोरच भावाने स्वतःच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. मयताचेही मेडिकल होते. परंतु, त्याला दारूचे व्यसन लागले. त्यामुळे दोघा भावांमध्ये वारंवार वाद व्हायचे. भाऊ दारू सोडायला तयार नव्हता. यातूनच डॉक्टरने भावाला मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला.
असा झाला खुनाचा उलगडा
पोलिस निरीक्षक आहेर यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास केला. सुरुवातीला हे प्रकरण वेगळे असल्याचा संशय होता. परंतु, चौकशीत विसंगती आढळून आल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी मयताचा भाऊ डॉक्टरला ताब्यात घेतले.