शेवगाव : येथील दुहेरी हत्याकांडाचे रहस्य उलगडण्यास शेवगाव पोलिसांना यश आले असून, या प्रकरणातील एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. पैसे, दागिन्याच्या मोहातून आजी-नातवाचा खून झाल्याचे समोर आले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी सांगितले.
शहरातील आयटीआयजवळील ईदगाह मैदानात रविवारी (दि. २४) अज्ञात महिलेचे शिर नसलेले धड मिळून आले होते. महिलेचे शिर शोधत असताना आणखी एका मुलाचा मृतदेह मिळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. या दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी शेवगावमध्ये दाखल होऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना तपासकामी सूचना दिल्या होत्या.
दरम्यान आरोपीच्या शोधासाठी नाशिक, औरंगाबाद, मध्य प्रदेश येथे वेगवेगळी पथके रवाना झाली होती. पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी शेवगाव, पाथर्डी येथे विविध ठिकाणी संबंधित महिला व मुलाच्या संदर्भात चौकशी केली. याचवेळी मृतदेह सापडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मयत मुलगा व त्याच्यासोबत एक इसम फिरत असल्याचे चित्रीकरण पोलिसांना मिळाले होते. त्यानंतर तपासाची चक्रे अधिक गतिमान करीत औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन येथून नेकपालसिंग पोटीयासिंग चितोडिया यास पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हत्याकांडाची कबुली दिली.
प्राथमिक तपासात मृत महिलेच्या जवळील चांदीचे दागिने व पैशासाठी त्या दोघांचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्या मृतदेहाची पोलिसांना ओळख पटली असून कमलाबाई कागडीसिंग चितोडिया (वय ७०), तर सुनील ऊर्फ टकल्या बिट्टूसिंग चितोडिया (वय १०) अशी मृतांची नावे आहेत. दोघांचे आजी व नातू असे नाते असल्याचे तपासात उघड झाले आहे. दोघेही राजस्थान राज्यातील चितौडगडचे रहिवासी आहेत.