मोदींनी ग्रामस्थांशी संवाद साधलाच नाही; नागरिकांचा अपेक्षा भंग

By Admin | Updated: April 30, 2017 18:55 IST2017-04-30T18:55:24+5:302017-04-30T18:55:24+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ग्रामस्थांशी थेट संवाद साधणार असल्याच्या अपेक्षेने सर्व गाव व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी हॉलमध्ये जमा झाला़

Modi has not communicated with the villagers; Breach of expectations of citizens | मोदींनी ग्रामस्थांशी संवाद साधलाच नाही; नागरिकांचा अपेक्षा भंग

मोदींनी ग्रामस्थांशी संवाद साधलाच नाही; नागरिकांचा अपेक्षा भंग

आॅनलाइन लोकमत
पिंपळगाव माळवी (अहमदनगर), दि़ ३० - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ग्रामस्थांशी थेट संवाद साधणार असल्याच्या अपेक्षेने सर्व गाव व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी हॉलमध्ये जमा झाला़ मात्र, मोदींनी गावकऱ्यांशी संवाद न साधता केवळ ‘मन की बात’ ऐकविल्यामुळे ग्रामस्थांचा अपेक्षा भंग झाला़
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात रविवारी (दि़ ३०) ते पिंपळगाव माळवी (ता़ नगर) ग्रामस्थांशी संवाद साधणार असल्याचे भाजपाच्यावतीने गावकऱ्यांना सांगण्यात आले होते़ प्रसिद्धी माध्यमांनाही खा़ दिलीप गांधी यांनी पंतप्रधान मोदी पिंपळगाव ग्रामस्थांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार असल्याचे कळविले होते़ या कार्यक्रमाची गावात जय्यत तयारी करण्यात आली होती़ जिल्हा परिषद शाळेमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सचा सेट उभा करण्यात आला होता़ सकाळी ११ वाजता पंतप्रधान मोदी संवाद साधणार असल्यामुळे गावकरी मोठ्या अपेक्षेने शाळेत दाखल झाले़ टीव्हीवरुन सकाळी ११ वाजता मोदींची ‘मन की बात’ कार्यक्रम सुरु झाला़ सर्व ग्रामस्थ टीव्हीसमोर कान देऊन मोदींची ‘मन की बात’ ऐकू लागले़ कार्यक्रम संपला तरी मोदींनी ग्रामस्थांशी संवाद साधलाच नाही़ त्यामुळे अपेक्षा भंग झालेल्या ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली़ त्यावेळी तेथे उपस्थित असलेले क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे माधव जायभाय, अविनाश गरुड यांनी उपस्थित काही ग्रामस्थांच्या कार्यक्रमाबाबत आणि सरकारच्या कामगिरीबाबत प्रतिक्रिया घेतल्या़ यावेळी पिंपळगाव माळवीचे सरपंच संतोष झिने, डोंगरगणचे सरपंच कैलास पटारे, ग्रामंपचायत सदस्य एकनाथ गुंड, विश्वनाथ गुंड, योगेश झिने, बापू बेरड, नानासाहेब झिने, भास्कर जाधव, अजित बोरा, डॉ़ महावीर बोरा आदी उपस्थित होते़
़़़़़़़़़
आम्ही शेतीतील काम बुडवून येथे आलो़ आमचा वेळ गेला़ मात्र, मोदींशी संवाद न झाल्याने नाराजीच पदरात पडली़
-गोरख आढाव, ग्रामस्थ
़़़़़़़़़़़़
शेतमालाचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांना अतिशय वाईट दिवस आले आहेत़ मोदी आमच्याकडून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतील, असे वाटले होते़ पण त्यांनी आमच्याशी संवाद साधलाच नाही़
-नानासाहेब झिने, ग्रामस्थ
़़़़़़़़़़़
उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली़ त्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, अशी विनंती आम्ही पंतप्रधानांना करणार होतो़ परंतु त्यांच्याशी आमचा संवाद झालाच नाही़
-संदीप झिने, ग्रामस्थ

Web Title: Modi has not communicated with the villagers; Breach of expectations of citizens