दूध उत्पादकांना दररोज बसतोय साडेपाच लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:06 IST2021-07-13T04:06:29+5:302021-07-13T04:06:29+5:30

सुपा : दूध दर घटल्याने पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील दूध उत्पादकांना दररोज जवळपास साडेपाच लाख रुपयांचा आर्थिक फटका सहन ...

Milk producers are hit by five and a half lakhs every day | दूध उत्पादकांना दररोज बसतोय साडेपाच लाखांचा फटका

दूध उत्पादकांना दररोज बसतोय साडेपाच लाखांचा फटका

सुपा : दूध दर घटल्याने पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील दूध उत्पादकांना दररोज जवळपास साडेपाच लाख रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. पशुखाद्याचे भाव वाढल्याने उत्पादन खर्च वाढला. त्यामुळे उत्पन्न व खर्चाचा मेळ घालताना दूध उत्पादक शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

परिणामी पूर्वी सुपा परिसरातून सव्वा लाखावर लिटर प्रतिदिन होणारे दूध संकलन कमी होऊन ६५ ते ७० हजारांवर स्थिरावल्याचे पारनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे प्रशासकीय मंडळाचे सदस्य व दूध उत्पादक सुरेश थोरात यांनी सांगितले.

कोरोनामुळे दूध खरेदीवर परिणाम झाल्याने भावात घट झाली, असे वरवर सांगितले जाते. त्यामुळे कोरोनाच्या दाखविलेल्या हिसक्याने दूध उत्पादक मात्र कमी उत्पन्नाच्या व जादा खर्चाच्या दूध व्यवसायाच्या दुष्ट चक्रव्यूव्हात सापडल्याचे बोलले जाते. लॉकडाऊनच्या आधी ३२ रूपये प्रति लिटर असणारे दूध मध्यंतरी २०-२२ वर आले होते. आता एकदा १ रुपया व दोनदा प्रत्येकी ५० पैशांची दरवाढ झाल्याने २४ रुपये दूध पोहोच करणाऱ्याच्या हातात पडतात. जवळपास ८ रुपये प्रतिलिटर दूध दरात घसरण झाल्याने ७० हजार लिटर दूध दररोज संकलन करणाऱ्या सुप्यातील दूध संकलन केंद्रावर दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांनाच्या उत्पन्नातील ५ लाख ६० हजारांच्या उत्पन्नाला कात्री लागल्याचे दूध व्यावसायिक रामचंद्र मांडगे व रावसाहेब मुंगसे यांनी संगितले.

सुप्यात पूर्वी दूध शीतकरण केंद्राच्या माध्यमातून दूध संकलन करणाऱ्या ७ प्लांटपैकी १ बंद झाल्याने ६ केंद्र संकलनाचे काम करतात. दुभत्या जनावरांना लागणाऱ्या पशुखाद्याच्या दरात क्विंटलमागे जवळपास ५०० ते ६०० रुपयांची वाढ झाल्याचे सुरेश थोरात यांनी सांगितले. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला या उलट उत्पन्न घटले. त्यातील तफावतीने दूध उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.

---

असे आहेत पशुखाद्याचे दर..

साई पशुखाद्य केंद्राचे संचालक बबन मुंगसे म्हणाले, पूर्वी १२०० रुपयांना मिळणारी सरकी पेंड १७०० ते १८०० रुपये, १८०० रुपये दर असणारी शेंगदाणा पेंड २२०० ते २६०० रुपयांवर गेली, तर एक हजारांच्या आसपास असणारी कांडी पेंड १२०० ते १५०० रुपयांपर्यंत पोहोचली. पशुखाद्य दर वाढल्याने शेतकऱ्यांवर उधार, उसनवारी करून व्यवसाय टिकविण्याची वेळ आली आहे.

----

बंद पडलेला पारनेर तालुका सहकारी दूध संघ पुन्हा सुरू करण्यात यश आले आहे. कोरोनाच्या महामारीचा फटका दूध व्यवसायालाही बसला हे नाकारता येत नाही. दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून याबाबत शासन पातळीवर पाठपुरावा करणार आहे.

-नीलेश लंके,

सदस्य, पारनेर-नगर विधानसभा मतदार संघ

Web Title: Milk producers are hit by five and a half lakhs every day